Johnson & Johnson Baby Powder : जॉन्सन बेबी पावडर उत्पादनाचा परवाना रद्द, अन्न-औषध प्रशासनाची मोठी कारवाई
Johnson & Johnson Baby Powder : जॉन्सन बेबी पावडरच्या उत्पादनाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) ही मोठी कारवाई केली आहे.
गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : लहान मुलांसाठी आवर्जून जॉन्सन बेबी पावडरचा (Johnson & Johnson Baby Powder) वापर केला जातो. याच जॉन्सन बेबी पावडरबाबत मोठी बातमी समोर आली आहे. जॉन्सन बेबी पावडरच्या उत्पादनाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) ही मोठी कारवाई केली आहे. कंपनीने आखून दिलेल्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. (johnsons baby powder product license revoked major action by food and drug administration)
अन्न आणि औषध प्रशासन कोणत्याही कंपनीला अटी आणि शर्थींसह उत्पादनासाठी परवाना देतं. जॉन्सन बेबी पावडरचा आणि अन्य उत्पादनचा लहान मुलांसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. लहान मुलांची त्वचा आणि एकूणच शरीर फार नाजूक असतं. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाकडून त्वचेसाठीच्या निकष ठरवून दिलेले असतात. मात्र जॉन्सन बेबीकडून या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं.
" जॉन्सन बेबी पावडर " या सौंदर्य प्रसाधनांचे नमुने प्रशासनाच्या नाशिक आणि पुण्यातील औषध निरीक्षकांनी गुणवत्ता चाचणी घेतली होती. यामध्ये मुंबईतील औषध नियंत्रण प्रयोगशाळेतील शासकीय विश्लेषकांनी उत्पादनाच्या नुमन्यात लहान मुलांच्या त्वचेसाठीच्या निकषात पावडर अपात्र ठरवण्यात आली. तसेच मुंबई उत्पादन कारखान्याचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आला.