बापरे! कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांमध्ये दिसतेय लिव्हरची समस्या
दिल्लीमध्ये काही कोरोनामुक्त रूग्णांना लिव्हर म्हणजेच यकृतासंबंधी समस्या समोर आल्याचं पाहायला मिळालं.
मुंबई : कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांमध्ये कोरोनातून बरं झाल्यानंतर काही इतर समस्या दिसून येतायत. यामध्ये ब्लॅक फंगस तसंच यलो फंगस या समस्या दिसून आल्यात. अशातच दिल्लीमध्ये काही कोरोनामुक्त रूग्णांना लिव्हर म्हणजेच यकृतासंबंधी समस्या समोर आल्याचं पाहायला मिळालं.
दिल्लीतील सर गंगाराम रूग्णालयात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान लिव्हरच्या समस्येचे रूग्ण पहायला मिळाले. गेल्या 2 महिन्यांत कोरोनाच्या संसर्गातून बरं झाल्यानंतर 14 रूग्णांच्या लिव्हरमध्ये पस असलेल्या मोठ्या फोड पहायला मिळाले. लीवरमध्ये पस झालेला फोड हा सामान्यपणे ‘एंटअमीबा हिस्टोलिटिका’ नावाच्या परजीवीमुळे होतं जे दूषित अन्न आणि पाण्यातून पसरतं.
दिल्लीच्या सर गंगा राम रूग्णालयातील इंस्टीट्यूट ऑफ लिवर गॅस्ट्रोएंटरोलॉजी एंड पॅन्क्रियाटिक बिलारी साइंसेज चेअरमन डॉ. अनिल अरोड़ा यांच्या सांगण्यानुसार, आमच्या असं पाहण्यात आलंय की, कोविडपासून बरं झाल्यानंतर 22 दिवसांच्या आत ज्या रुग्णांमध्ये इम्यूनो कम्पीटेंट होते त्यांच्यात यकृताच्या दोन्ही बाजूंमध्ये पस निर्माण झाल्याचं समोर आलं. यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं.
या रूग्णांना ताप आणि ओटीपोटात वेदना होण्याची समस्या जाणवली. मुख्य म्हणजे काही रूग्णांनी कोरोनाच्या उपचारांमध्ये स्ट्रेरॉईड्स घेतले होते.
प्राध्यापक अनिल अरोरा यांनी सांगितलं की, 'आम्हाला असं वाटतंय की, कोविड संसर्गावर उपचार करण्यासाठी स्टेरॉइड्सचा वापर करणं आणि या साथीच्या आजारात कोविडपासून बरं झालेल्या रूग्णांमध्ये लिव्हरला फोड आल्याचा संशय आहे. दरम्यान उपचारांमधील विलंबामुळे होते हे फोड मोठे झाल्याची शक्यता आहे.'