Sesame Seeds Ladoo In Makar Sankranti : नव्या वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती (Makar Sankranti 2024). हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. जेव्हा सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गूळ दान करणे, त्यापासून बनलेले पदार्थ खाणं शुभ मानलं जातं. आपण मकर संक्रांतीला तिळाचे लाडू (Sesame Seeds Ladoo) वाटतो. मात्र, तुम्हाला माहितीये का? मकर संक्रांतीला तिळाचे लाडू का केले जातात? तुम्हालाही याचं उत्तर कदाचित माहित नसेल. चला तर मग जाणून घेऊया...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अध्यात्मिकदृष्ट्या तीळ महत्त्वाचं


आयुर्वेदानुसार हिवाळ्यात तीळ खाणं आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. अध्यात्मिकदृष्ट्या, तीळ आणि तिळाच्या तेलामध्ये सत्व शोषून घेण्याची आणि उत्सर्जित करण्याची क्षमता इतर कोणत्याही तेलापेक्षा अधिक असते. त्याचबरोबर नकारात्मक विचार नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा मिळते. त्यामुळे जर तिळाचे लाडू खाल्ले तर प्रत्येकाची सात्त्विकता वाढण्यास मदत होते, अशी मान्यता आहे.


तिळाचे लाडू आरोग्यासाठी फायद्याचे (Benefits Of Sesame Seeds)


छोट्याशा दिसणाऱ्या तिळात पौष्टिकता मात्र भरपूर असते. त्यामुळेच हजारो वर्षांपासून आपण तीळ आणि तिळाचं तेल वापरत आलो आहोत. तिळात कॅल्शियम तर असतंच, याशिवाय मँगनीज, लोह, फॉस्फरस, सेलेनियम, ब गटातील जीवनसत्त्वे आणि तंतुमय पदार्थही आहेत. तिळाच्या बियांमध्ये सेसमिन आणि सेसमोलिन या दोन गोष्टी असतात. तिळ खाल्ल्याने मधुमेही रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. दातांच्या मजबुतीसाठी आणि स्वच्छतेसाठी तिळाचा चांगला उपयोग होतो. याशिवाय केसांची वाढ चांगली व्हावी यासाठी तिळाचे तेल केसांना लावणं चांगलं असतं.


तिळात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स उच्च प्रमाणात असल्यामुळे रोग प्रतिकारशक्तीही वाढते. तिळातील कॅल्शियम हाडांसाठी चांगलं तर आहेच, तसेच तिळात झिंक जास्त असते, जे हाडांचा ठिसूळपणा रोखण्यास मदत करते. थोडक्यातच स्त्रियांना याचा खूप फायदा होऊ शकतो. तुम्हाला जर हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजार असतील तर तुम्ही रोज तीळ खाल्ले पाहिजेत. उच्च रक्तदाब कमी करण्याचे काम देखील तीळ करते.


मकर संक्रांती तिथी आणि मुहूर्त  (Makar Sankranti 2023 Date)


गेल्या दोन वर्षांनुसार यंदाही मकर संक्रांती 15 जानेवारीला साजरा करण्यात येणार आहे. मिथिला पंचांगानुसार, सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी, तर काशी पंचांगानुसार, सकाळी 8 वाजून 42 मिनिटांनी सूर्य धनु राशीतून मकर राशीत गोचर करणार आहे. यामुळे 15 जानेवारीच्या दिवशीच मकर संक्रांती साजरा करण्यात येणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)