मुंबईला Monkeypox चा धोका? मुंबई महापालिका अलर्टवर!
मंकीपॉक्सचा धोका पाहता मुंबई महापालिकेने सावध पवित्रा हाती घेतला आहे.
मुंबई : कोरोनानंतर आता मंकीपॉक्सच्या संसर्गाने डोकं वर काढलं आहे. युरोपीय देशांमध्ये या संसर्गाने थैमान घातलं आहे. तर आता मंकीपॉक्सचा धोका पाहता मुंबई महापालिकेने सावध पवित्रा हाती घेतला आहे. यानुसार आता मुंबई विमानतळावर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. शिवाय विमानतळ अधिकारी परदेशातून आणि मंकीपॅाक्सची साथ असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करतेय.
मुंबई पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड आणि 28 बेड्स तयार करण्यात आले आहेत. यानुसार त्यांचे चाचणी नमुने एनआयव्ही पुणे प्रयोगशाळेत पाठवले जातील.
मुंबईतील सर्व आरोग्य सुविधांना रूग्णालयांना सांगण्यात आलंय की, कोणत्याही संशयित प्रकरणाची सूचना कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात यावी.
काय आहे मंकीपॅाक्स?
मंकीपॉक्स व्हायरसच्या संसर्गामुळे होतो. याचा संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये फ्लूची लक्षणं दिसतात. बहुतेक लोकं काही आठवड्यांत बरे होतात, परंतु जर परिस्थिती आणखी बिघडली तर मात्र न्यूमोनिया देखील होऊ शकतो. या व्हायरसचा संसर्ग झाल्यापासून लक्षणं दिसून येईपर्यंतचा काळ असतो. हा कालावधी 7 ते 14 दिवसांचा असतो.
महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाची मंकीपॉक्ससंदर्भात मार्गदर्शक तत्वं
गेल्या 21 दिवसांत प्रभावित देशांमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व संशयित रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवलं जाणार
संशयित रुग्णांची माहिती स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीने आरोग्य विभागाला देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत
या रूग्णांवर उपचार करताना सर्व संसर्ग नियंत्रण पद्धती पाळल्या पाहिजेत
रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू केले जाईल.
थुंकी आणि संशयित रुग्णांचे नमुने एनआयव्ही पुणे याठिकाणी तपासणीसाठी पाठवले जातील.
गेल्या 21 दिवसांत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांना ताबडतोब शोधून क्वारंटाईन करावं लागेल.
जोपर्यंत संशयित रुग्णांच्या सर्व जखमा बऱ्या होत नाहीत आणि त्वचेचा एक नवीन थर तयार होत नाही, तोपर्यंत क्वारंटाईन संपवता येणार नाही, असं यात सांगण्यात आलं आहे.