गुदद्वारातून आत टाकलेली बाटली डॉक्टरांनी शस्त्रक्रिया न करता बाहेर काढली
ही बाटली त्याच्या मोठ्या आतड्यात अडकली.
मुंबई : मुंबईतील पालिकेच्या रुग्णालयात सध्या कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पण कोरोना नसलेल्या रुग्णांची कशी काळजी घेतली जाते याचे एक उदाहरण समोर आले आहे. एका व्यक्तीच्या संडासवाटे आतड्यांमध्ये गेलेली जिरा बॉटल शस्त्रक्रीया न करता दुर्बिणीद्वारे काढण्यात सायन रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे.
मुंबईत ३२ वर्षांच्या एका मनोरुग्णाने ७ सेंटीमीटरची प्लास्टिकची जिरा बॉटल गुदद्वारात म्हणजेच शौचमार्गे आत टाकली. ही बाटली त्याच्या मोठ्या आतड्यात अडकली.
त्याच्या पोटात दुखू लागल्यावर आधी जेजे आणि नंतर सायन रुग्णालयात नेण्यात आले. सिटी स्कॅन केल्यावर त्यात बाटली अडकल्याचे कळाले.
गॅस्ट्रोइंट्रॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. मेघराज इंगळे आणि त्यांच्या टीमने अत्यंत अवघड आणि दुर्मिळ इंडोस्कॉपी केली. रुग्णाला प्रथम स्पायनल एनस्थेशिया देण्यात आला. त्यामुळे आतडी खुली झाली आणि बाटली गुदद्वारे बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला. कोणतीही शस्त्रक्रीया न करता बाटली शरीराबाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलं.
शस्त्रक्रिया न करता ती बॉटल संडासच्या वाटेतून काढली गेली. त्याला वेगळ्या प्रकारच्या एनेस्थेशिया देऊन ही बॉटल काढल्याचे डॉ. मेघराज यांनी 'झी २४ तास' शी बोलताना सांगितले.
सध्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची कोरोना टेस्ट केल्याशिवाय त्यांना हात देखील लावला जात नाही. पण या रुग्णाच्या बाबतीत वेळ घालवला असता तर त्याच्या जीव गेला असता. म्हणून डॉक्टरांनी जीवाची पर्वा न करता या रुग्णावर उपचार करत ही शस्त्रक्रीया यशस्वी केली आहे. त्यामुळे डॉक्टरांचे सर्व स्तरातून कौतूक होतयं.