आज लस नाही; लस घेण्यासाठी सोमवारची वाट पाहावी लागणार
पुन्हा एकदा लसीकरणामध्ये खंड पडला आहे.
मुंबई : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी देशात लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली आली आहे. शहरात दोन दिवसांच्या खंडानंतर लसीकरण सुरू झाल्यामुळे शनिवारी अनेक केंद्रांवर लस घेण्यासाठी गर्दी झाली होती. मात्र पुन्हा एकदा लसीकरणामध्ये खंड पडला आहे. आज म्हणजे रविवारीही लसीकरण बंद असल्याचं चित्र दिसून आलं आहे.
रविवारी लसीकरण बंद असल्याने नागरिकांना आता सोमवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. शनिवारी शहरातील अनेक केंद्रावर लसीकरणासाठी लांबलचक रांगा लागलेल्या होत्या. शुक्रवारी रात्रीपासूनच नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयाच्या केंद्रावर शनिवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रांगा होत्या.
तर दुसरीकडे शनिवारी मुंबईत उच्चांकी लसीकरण पार पडल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. मुंबईत आतापर्यंत ८५ लाख २ हजार ७७ कोरोना प्रतिबंधक लस दिली गेली आहे. त्यापैकी २१ लाख ६१ हार ९३९ जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर ६३ लाख ४० हजार १३८ जणांना लसीचा एक डोस देण्यात आला आहे.
तर संपूर्ण राज्यात शनिवारी दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांना लस देण्याचा विक्रम नोंदविला आहे. एकाच दिवशी सुमारे अकरा लाखाच्या आसपास नागरिकांना लसीकरण करून आरोग्य विभागाने केलेल्या अतुलनीय कामाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली असून याबद्दल आरोग्य यंत्रणेनेचे कौतुक करीत अभिनंदन केलं आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत शनिवारी संध्याकाळी सातपर्यंत ५२०० लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून १० लाख ९६ हजार ४९३ नागरिकांना लस देण्यात आली. काही दिवसांपूर्वी राज्यातील आतापर्यत दिलेल्या डोसेसची संख्या ५ कोटींवर गेली असून देशभऱात उत्तरप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राने ही विक्रमी कामगिरी केली आहे.