वर्ल्ड रेकॉर्डच्या जवळ पोहचलेल्या दिव्यांग डान्सर विनोद ठाकुरची प्रकृती बिघडली
`नच बलिए`,`इंडियाज गॉट टॅलेंट` अशा रिएलिटी शो मधून घराघरात पोहचलेल्या दिव्यांग ब्रेक डान्सर विनोद ठाकूर यांची तब्येत अचानक खालावली आहे.
मुंबई : 'नच बलिए','इंडियाज गॉट टॅलेंट' अशा रिएलिटी शो मधून घराघरात पोहचलेल्या दिव्यांग ब्रेक डान्सर विनोद ठाकूर यांची तब्येत अचानक खालावली आहे. आयसीयूमध्ये उपचार घेत असलेले विनोद ठाकूर सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत.
वर्ल्ड रेकॉर्डपासून राहिले दूर
विनोद एक वर्ल्ड रेकॉर्ड रचण्याचा प्रयत्न करत होता. 30 दिवसांमध्ये व्हील चेअरच्या मदतीने इंडिया गेट ते गेटवे ऑफ इंडिया हा प्रवास करायचा होता. 1500 किमीचा हा प्रवास केवळ एका व्हिल चेअरच्या मदतीने करणं कठीण होतं, मात्र तरीही विनोद जिद्दीने त्याचा पाठलाग करत होता.
मुंबईत पोहचताच विनोदची तब्येत बिघडली होती. दिल्लीहून विनोद 18 मार्चला निघाला होता. सध्या मालाड येथील एका हॉस्पिटलमध्ये विनोदवर उपचार सुरू आहेत.
प्रकृती नाजूक
विनोदला डीहायड्रेशन, लो बीपी, हृद्याचे ठोके अनियमित पडणे असा त्रास होत आहे. त्याची प्रकृती नाजूक असल्याचे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.