या आयुर्वेदीक उपचारांंनी दूर ठेवा पावसाळ्यातील इंफेक्शन
पावसाळ्याच्या दिवसात वातावरणामध्ये जसा बदल होतो तसे आजारपणही वाढते.
मुंबई : पावसाळ्याच्या दिवसात वातावरणामध्ये जसा बदल होतो तसे आजारपणही वाढते. या आजारापासून बचावण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी डॉक्टरांच्या उपचारांबरोबर काही घरगुती आणि आयुर्वेदीक उपाय फायदेशीर ठरणार आहेत.
१.तुळस– तुळशीच्या वापरामुळे शरीरातील कफ पातळ होतो व खोकला कमी होतो.छातीमधील कफाचा अडथळा दूर होतो व श्वसनमार्ग खुला होतो.श्वसनविकार लवकर बरे होतात.तसेच तुळस Antitussive असल्यामुळे या औषधी वनस्पतीच्या वापरामुळे फुफ्फुसे स्वच्छ होतात.आपल्या रोगप्रतिकारशक्तीला चालना देण्याचा सोपा मार्ग म्हणजे दररोज एक ते दोन कप तुळशीचा चहा घेणे.तुळशीमधील अॅन्टी बॅक्टेरियल गुणधर्मामुळे पावसाळ्यामध्ये तुमचे संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण होते.गरमगरम तुळशीचा चहा घेतल्यामुळे पावसाच्या थंड वातावरणामध्ये देखील तुमच्या शरीरातील तापमान नियंत्रित रहाते.तुळस नैसर्गिक रित्या शरीर डिटॉक्सिफीकेशन करण्यास मदत करते.यासाठी वाचा तुळस – सर्दी, तापावर प्रभावी घरगुती उपाय
२.गुडूची- गुडूची ही औषधी वनस्पती रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करते.तसेच या वनस्पतीच्या वापरामुळे इनफेक्शन टाळण्यासाठी पांढ-या रक्त पेशींचा प्रभाव वाढविला जातो.आजारापणातून लवकर बरे होण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याचे कार्य देखील ही औषधी वनस्पती करत असते.यासाठी वाचा कावीळ झाल्यास करा हे आयुर्वेदिक उपचार !
३.अश्वगंधा– अश्वगंधा मुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते,तसेच शरीरातील उर्जा व कार्यक्षमता देखील वाढते. यामुळे मज्जासंस्थेला आराम मिळून शांत झोप लागते.अश्वगंधामुळे कोलेस्टेरॉल कमी करणे,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे,मलेरियाला प्रतिबंध करणे असे अनेक चांगले फायदे होतात.
४.त्रिफळा चुर्ण- त्रिफळा चुर्ण हे आवळा,बेहडा व हिरडा या तिघांच्या मिश्रणातून तयार केलेले एक आयुर्वेदिक औषध असून ते एक उत्तम अॅन्टीऑक्सिडंट आहे.या औषधामुळे पावसाळ्यामध्ये तुमची पचन प्रकिया सुधारते.तसेच आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात.ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढून तीव्र सर्दीपासून आराम मिळतो.बेहड्यामुळे खोकला व कफ कमी होतो.यामुळे जुलाब व डायरिया या सारख्या समस्या देखील कमी होतात.हिरड्याच्या चुर्णाने गुळण्या केल्यास घशाला आराम मिळतो.तसेच हिरड्यामुळे पचनसंस्था देखील सुधारते.