महाराष्ट्राशेजारच्या `या` राज्यात डेल्टा प्लसचा एकंही नवा रूग्ण नाही
देशातील एका राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचा नवा रूग्ण सापडला नाहीये.
मुंबई : भारतात सापडलेल्या कोरोना डेल्टा प्लस व्हायरसचा अख्ख्या जगालाच धोका आहे. महाराष्ट्रात देखील या डेल्टा प्लस व्हेरीएंटचे 20 रूग्ण असल्याची माहिती आहे. देशभरात आतापर्यंत 50 च्या जवळपास रूग्ण आढळून आले आहेत. दरम्यान देशातील एका राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचा नवा रूग्ण सापडला नाहीये.
गुजरात सरकारने शुक्रवारी म्हटलं आहे की, राज्यात डेल्टा प्लस प्रकारचं कोणतंही नवीन प्रकरण आढळलेलं नाही. एप्रिलमध्ये ज्या व्यक्तींमध्ये या प्रकारचा संसर्ग आढळला होता असे दोन रुग्ण बरे झाले असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.
गांधीनगरचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज अग्रवाल यांच्या सांगण्यानुसार, एप्रिलमध्ये दोन व्यक्तींमध्ये डेल्टा प्लसचा प्रकार आढळला होता. यापैकी एक रुग्ण सूरतचा होता तर दुसरा वडोदऱ्याचा होता. आता हे दोघेही ठीक झाले आहेत."
ते पुढे म्हणाले, “दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे आणि आम्ही स्थानिक पातळीवर त्यांच्या आरोग्यावर नजर ठेवून आहोत. त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचा आम्ही शोध घेतला पण त्यांच्यामुळे डेल्टा प्लस इतर कोणालाही लागण झाली नाहीये.”
अग्रवाल म्हणाले की, तरीही राज्य प्रशासनाला याबाबत सतर्क करण्यात आलं आहे आणि व्हायरसचे हे प्रकार शोधण्याबाबत तपासही सुरू आहे.
भारतातील 18 जिल्ह्यांमध्ये कोरोना डेल्टा प्लस व्हेरिएंटची 50 प्रकरणं आतापर्यंत सापडली आहेत. कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटची सर्वाधिक प्रकरणं महाराष्ट्रात आढळली आहेत. आतापर्यंत राज्यात 20 रुग्ण आढळले आहेत. तर मध्य प्रदेशात 7 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
तर महाराष्ट्रात डेल्टा प्लसचा एक बळी गेला आहे. रत्नागिरीमध्ये एका 80 वर्षीय आजीचा मृत्यू झाला आहे. 13 जून रोजी या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत्यूनंतर स्वॅब टेस्ट केली असता त्यांचा मृत्यू कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंटने झाला असल्याचं समोर आलं आहे.