नेदरलँड्स : कोरोनाचा धोका अजून पूर्णपणे टळलेला नाही. कोरोनाची लागण झालीये याची खात्री करण्यासाठी आरटी-पीसीआर टेस्ट करावी लागते. दरम्यान आता या कोरोना चाचणीची एक मोठी अडचण दूर होणार आहे. कारण आता तुमच्या आवाजावरून कोरोनाची माहिती मिळण्यास मदत होणार असल्याचा दावा करण्यात येतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेदरलँड्समधील मास्ट्रिच विद्यापीठातील डेटा सायन्स संस्थेने एक अॅप विकसित केलं आहे. या अॅपद्वारे कोविड-19 संसर्ग ओळखणं शक्य होणार आहे. यामध्ये हे अॅप लोकांचा आवाज ऐकेल आणि त्यांना कोरोना झाला की नाही हे सांगेल. यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI ची मदत घेतली जाईल.


अनेक अँटीजन चाचण्यांपेक्षा हे अॅप अधिक अचूक असल्याचा दावाही संशोधक संघाकडून करण्यात आला आहे. याशिवाय लोकांसाठी ते खूप स्वस्तही असण्याची शक्यता आहे.


इन्स्टिट्यूट ऑफ डेटा सायन्सचे संशोधक वफा अल्जबावी यांच्या मते, या अॅपचे परिणाम खूप आशादायक आहेत. फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने ते थोडे वाढवण्याची गरज आहे. चाचणी करण्यासाठी फक्त एक मिनिट लागणार आहे. गर्दीच्या ठिकाणी त्याचा वापर खूप प्रभावी ठरू शकतो.


दूर बसून टेस्ट होणार?


या अॅपच्या मदतीने दूर बसूनही चाचण्या केल्या जाऊ शकतात, असा दावा केला जातोय. संशोधकांच्या लक्षात आलं की, कोविड -19 चा परिणाम व्यक्तीच्या आवाजावर देखील होतो. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाचा आवाज थोडा बदलतो. आवाजातील हा बदल आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने पकडला जातो. आवाजातील जडपणापासून ते इतर बदल अॅपच्या मदतीने समजलं जाऊ शकतं.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, अॅपने चाचणीसाठी केंब्रिज युनिव्हर्सिटीकडून आवाजाचे नमुने घेतले आहेत. यामध्ये निरोगी आणि आजारी व्यक्तींचे एकूण 4,352 नमुने घेण्यात आले असून, त्यापैकी 308 नमुने कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. 


89 टक्के कोरोना पॉझिटिव्ह आणि 83 टक्के कोरोना नकारात्मक परिणाम शोधण्यात अॅप यशस्वी ठरलंय. मात्र, आता सर्व काही सुरुवातीच्या टप्प्यात असल्याने हे अॅप सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यास थोडा वेळ लागणार आहे. अॅपचे मॉडेल न्यूरल नेटवर्कवर आधारित असून जे मानवी मेंदूला समजून घेण्याचा प्रयत्न करतंय.