मूतखड्याचा त्रास टाळण्यासाठी आहारात टाळा हे `6` पदार्थ !
आजकाल दगदगीच्या जीवनशैलीमुळे खाण्यापासून ते अगदी झोपण्यापर्यंतच्या अनेक सवयींमध्ये बदल झाले आहेत.
मुंबई : आजकाल दगदगीच्या जीवनशैलीमुळे खाण्यापासून ते अगदी झोपण्यापर्यंतच्या अनेक सवयींमध्ये बदल झाले आहेत. यामुळे कळत नकळत आपण काही समस्यांना आमंत्रण दिले आहे. अशामध्ये किडनीविकार बळावण्याची शक्यताही वाढली आहे. मूतखड्याचा त्रास वेदनादायी असल्याने त्याला टाळण्यासाठी वेळीच काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचे आहे. यामध्ये एरवी आरोग्यदायी वाटणारे पदार्थदेखील मूतखड्याच्या रूग्णांसाठी त्रासदायक ठरू शकतात.
सिमला मिरची -
सिमला मिरची किंवा ढोबळी मिरची यामध्ये ऑक्सलेट क्रिस्टल्स अधिक प्रमाणात आढळतात. हे कॅल्शियम ऑक्सलेट्स शरीरात मूतखडा निर्माण होण्यास कारणीभूत ठरू शकतात.
चॉकलेट्स -
तुम्हांला पूर्वी पोटाचे विकार किंवा मूताखड्याचा त्रास झालेला असल्यास ऑक्सलेटयुक्त चॉकलेटचं सेवन टाळावे. चॉकलेट हा अनेकांचा वीकपॉईंट असू शकतो मात्र यामुळे मूतखड्याचा त्रास पुन्हा बळावण्याची शक्यता असल्याने कमीत कमी प्रमाणात अशाप्रकारची चॉकलेट्स खावीत.
टॉमेटो -
टॉमेटोच्या बीयांमध्ये ऑक्सलेटचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे मूतखड्याचा त्रास असलेल्यांच्या आहारातून टॉमेटोच्या बीया काढून टाकाव्यात.
चहा -
अनेकांच्या दिवसाची सुरूवात चहामुळे होते. मात्र अति प्रमाणात चहा प्यायल्याने आरोग्याचे नुकसान होते सोबतच मूतखड्याचाही त्रास बळावतो.
मांसाहार -
सीफूड्समध्ये मुबलक प्रमाणात प्यरीन्स घटक असतात. याच्या सेवनामुळे शरीरात युरिक अॅसिड वाढते. परिणामी युरिक अॅसिडमधूनच स्टोन निर्माण होण्याची शक्यता वाढते.
सुकामेवा -
ऑक्सलेटयुक्त पदार्थांमध्ये सुकामेव्याचाही समावेश होतो. मात्र अतिप्रमाणात सुकामेवा खाणं मूतखड्याच्या रूग्णांसाठी त्रासदायक ठरू शकते.