ज्याची भिती होती ते घडलंच; भारतात कोरोनाच्या सब-व्हेरिएंटचा सापडला पहिला रूग्ण
ओमिक्रॉनचा नवा व्हेरियंट सापडल्याने पुन्हा नवं संकट उभं राहिलं आहे.
मुंबईः भारतात कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येत असतानाच आता पुन्हा चिंता वाढली आहे. कोरोनानं पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे.ओमिक्रॉनचा नवा सब-व्हेरियंट सापडल्याने पुन्हा नवं संकट उभं राहिलं आहे.
भारतात आढळलेला ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या BA.4 हा कोरोनाचा स्ट्रेन संसर्ग आणि लसीकरणामुळे मिळालेल्या रोगप्रतिकारक क्षमतेलाही प्रभावित करण्यासाठी सक्षम आहे.
कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या BA.4 सब-व्हेरिएंटने भारतात शिरकाव केला आहे. देशात या व्हेरियंटचा पहिला रुग्ण सापडला आहे. हैदराबादमध्ये हा रुग्ण सापडला असून रुग्णावर उपचार सुरू आहेत.
शास्त्रज्ञांनी सांगितलं की, भारतातील BA.4 सब-व्हेरिएंटची नोंद 9 मे रोजी GISAID वर करण्यात आली आहे. हा स्ट्रेन दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाच्या मोठ्या लाटेसाठी कारणीभूत ठरला आहे. हा संसर्ग आणि लसीकरणामुळे मिळालेल्या रोगप्रतिकारक क्षमतेलाही प्रभावित करण्यासाठी सक्षम आहे.
या वर्षी जानेवारीत भारतात आलेल्या ओमिक्रॉनच्या व्हेरिएंटच्या लाटेमुळे भारतातील लोकांमध्ये चांगली आणि व्यापक प्रमाणात इम्युन रिस्पॉन्स पाहायला मिळाला. ज्यामुळे संक्रमणाची शक्यता कमी आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, ओमिक्रॉनचा BA.4 आणि BA.5 सब व्हेरिएंट जगभरात कोरोनाची प्रकरणं वाढण्यासाठी कारणीभूत ठरला आहे. 12 पेक्षा जास्त देशात हा सापडला आहे.
16 देशांत BA.4 चे जवळपास 700 रुग्ण तर BA.5चे 300 पेक्षा अधिक रुग्ण 17 देशांत आहेत. कोरोनाचे हे सब व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य आहेत पण तितके घातक ठरले नाहीत.
त्यामुळे कदाचित हा किंचिंत दिलासा आहे मात्र धोका अजून टळलेला नाही त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य प्रशासनाने केलं आहे.