मुंबई : आजपासून दीड महिन्याच्या बालकांना ‘न्‍युमोनिया’ व इतर ‘न्‍युमोकोकल’ आजारांपासुन संरक्षण देणारी ‘न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन’ (Pneumococal Conjugate Vaccine / PCV) देण्‍यास सुरूवात करण्‍यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात मनपा आरोग्‍य केंद्रांमध्ये आणि रूग्‍णालयांमध्‍ये असणा-या आरोग्य केंद्रांमध्ये सकाळी 9 ते दुपारी 1 या कालावधी दरम्यान ही लस मोफत दिली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्‍य शासनाच्‍या निर्देशांनुसार 13 जुलै पासून सुरु करण्यात येत असलेल्या पीसीव्ही लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात दीड महिन्याच्या बालकांना लसीचा पहिली डोस देण्यात येणार आहे. हे लसीकरण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 208 ठिकाणी करण्यात येणार आहे. लस, सिरींजेस आणि इतर सामुग्री इत्यादींच्या वितरणाची व्‍यवस्‍था देखील करण्‍यात आली आहे.


लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत बीसीजी, पोलिओ, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, हेपेटाइसिस-बी, एच इन्फ्लुएंझा-बी, रोटा वायरस, गोवर, रुबेला या आजारांवर प्रतिबंधक लस देण्यात येते. राज्य शासनाच्या निर्देशांनुसार सदर लसीकरण मोहिमेत ‘न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन’ (PCV) या लशीचा अंतर्भाव करण्यात आल्याने बालकांना ‘न्युमोकोकल न्युमोनिया’ आणि इतर ‘न्युमोकोकल’ आजारांपासून संरक्षण मिळू शकणार आहे.


भारतात सन 2010 मध्ये ‘न्युमोकोकल’ या आजाराने पाच वर्षाखालील अंदाजे 1 लाख बालमृत्यूंची नोंद झाली होती. तर त्याचवर्षी देशभरात 5 ते 6 लाख बालकांना ‘न्युमोनिया’ हा गंभीर आजार झाल्याची नोंद देखील झाली होती. ‘स्ट्रेप्टोकोकस न्युमोनिया’ या जीवाणूमुळे ‘न्युमोकोकल’ हा संसर्गजन्य आजार होतो. हा आजार म्‍हणजे फुप्फुसांना होणारा एक प्रकारचा संसर्ग आहे. या आजारामुळे बालकांना श्वास घ्यायला त्रास होतो, धाप लागते, ताप येतो आणि खोकलाही येतो. जर सदर संसर्ग गंभीर स्वरूपाचा असल्‍यास तर मेंदुज्वर, नुमोनिया सेप्टीसीमीया अशा कारणामुळे मृत्यू देखील ओढवू शकतो.


यासाठी भारत सरकारने न्युमोकोकल आजारापासून बालकांचं संरक्षण करण्‍यासाठी सार्वत्रिक लसीकरणामध्ये ‘न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन’ (PCV) ही लस उपलब्ध करुन दिली आहे. नियमित लसीकरण कार्यक्रमात ‘न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन’ (PCV) या नवीन लसीचा अंतर्भाव करण्यात येणार आहे.