मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. कोविड-19 विषाणू प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने कोविड लसीचे दोन्ही डोस घेऊन लसीकरण पूर्ण करणं आवश्यक आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन मुंबईतील सर्व सरकारी आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रावर उद्या म्हणजेच शनिवारी कोविड-19 लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्‍यांसाठी विशेष सत्र आयोजित करण्यात आलं आहे. त्यामुळे या दिवशी कोविड लसीचा पहिला डोस कोणालाही दिला जाणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रीय कोविड 19 लसीकरण कार्यक्रम अंतर्गत 16 जानेवारीपासून मुंबईत लसीकरण मोहीम टप्प्याटप्प्याने सुरु आहे. या लसीकरण कार्यक्रमामध्‍ये आतापर्यंत 69 लाख 26 हजार 255 जणांना पहिला डोस तर 25 लाख 17 हजार 613 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. या आकडेवारीवरुन असं निदर्शनास आलंय की, पहिल्या डोसाच्या तुलनेत दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्‍यांचं प्रमाण कमी आहे.


'ब्रेक द चेन'या अंतर्गत नव्‍याने सुधारीत तत्‍वं प्रसारीत करण्‍यात आली आहेत. त्यात दोन्ही डोस घेतलेल्‍या लाभार्थ्‍यांना उपनगरीय रेल्‍वे प्रवासाची मुभा देखील देण्‍यात आलेली आहे.


सध्याच्या परिस्थितीत कोविड 19 या आजारांची रुग्‍णसंख्‍या वाढताना दिसतेय. कोरोनाची तिसरी लाट येण्‍याची शक्‍यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवली आहे.‍ या सर्व पार्श्वभूमीवर कोविड लसीचा दुसरा डोस घेऊन नागरिकांचं लसीकरण पूर्ण होणं आवश्‍यक आहे. त्यामुळे दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांनी सदर सत्राचा जास्‍तीत जास्‍त प्रमाणात लाभ घ्यावा, असं आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्‍यात येत आहे.