मेलबर्न : २०४० पर्यंत प्रत्येक वर्षी जगभरात १.५ कोटीहून अधिक लोकांना केमोथेरपी करण्याची गरज भासू शकते अशी शक्यता अभ्यासकांकडून वर्तवण्यात आली आहे. कमी आणि मध्यम लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये कॅन्सर आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी जवळपास १ लाख कॅन्सर डॉक्टरांचीही आवश्यकता भासणार आहे. एका अभ्यासातून हा दावा करण्यात आला आहे. नुकत्याच 'लांसेट ऑन्कोलॉजी'ने प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, २०१८ ते २०४० पर्यंत जगभरात दरवर्षी केमोथेरपी करणाऱ्या रुग्णांच्या संख्येत ५३ टक्क्यांची वाढ होऊन ती संख्या ९८ लाखांहून १.५ कोटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रीय, प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर केमोथेरपीसाठी पहिल्यांदाच अशाप्रकारचा अभ्यास करण्यात आला आहे. सिडनीतील यूनिवर्सिटी ऑफ न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलियातील इंगहॅम इंन्स्टिट्यूट फॉर अप्लाइड मेडिकल रिसर्च, किंगहार्न कॅन्सर सेंटर, लीवरपूल कॅन्सर थेरेपी सेंटर आणि 'इंटरनेशनल एजेंसी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर'च्या अभ्यासकांनी हे अध्ययन केलं आहे.


'यूएनएसडब्ल्यू'चे अभ्यासक ब्रुक विल्सन यांच्या मते, जगभरात कॅन्सरच्या रुग्णांची वाढती संख्या आरोग्य क्षेत्रातील सर्वात मोठा धोका असल्याचं म्हटलं आहे. वर्तमान आणि भविष्यात रुग्णांवर सुरक्षित उपचार करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी तात्काळ काही धोरणं तयार करण्याची आवश्यकता असल्याचंही त्यांनी म्हटलंय.