तुमची `ही` नावडती भाजी तुमचं वजन कमी करण्यास करेल मदत; आजच आहारात करा समावेश
मात्र तुम्हाला माहितीये का ही भाजी खाणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
मुंबई : भोपळ्याची भाजी तुम्हाला आवडते का? घरी भोपळ्याची भाजी केली असेल तर तुम्हीही नाक मुरडता? मात्र तुम्हाला माहितीये का भोपळा खाणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यापूर्वी तुम्ही बाजारात भोपळा हिरवा, लाल किंवा पांढऱ्या रंगाचा पाहिला असेल. पण जगामध्ये एकूण भोपळ्याच्या 150 प्रजातींची नोंद आहे.
भोपळ्यामध्ये अनेक प्रकारचं जीवनसत्त्वं आणि खनिजं असतात. यामुळे डोळे तसंच हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. शिवाय हाडं देखील मजबूत होतात आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या नावडत्या भोपळ्याचे आरोग्यदायी फायदे
डोळ्यांसाठी फायदेशीर
भोपळा तुमची दृष्टी सुधारण्यास फायदेशीर आहे. भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन एचा स्रोत आहे, ज्यामुळे डोळ्यांच्या अनेक समस्यांचा धोका कमी होतो. शिवाय यामुळे मोतीबिंदूचा धोका कमी होतो.
वजन कमी करतो भोपळा
हेल्दी डाएट घेऊन वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर भोपळा तुमच्यासाठी फायदेशीर आहे. भोपळ्यात भरपूर प्रमाणात पाणी असतं, त्यामुळे त्यात भरपूर पोषक असतात पण कॅलरीज कमी असतात. त्यामुळे याच्या सेवनाने तुम्ही वजन कमी करू शकता.
कोलेस्ट्रॉल कमी करतो
भोपळ्यामध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे याचं सेवन केल्यानंतर तुम्हाला भूक लागत नाही. तुमचं पोट बराच काळ भरलेलं राहतं. अशा परिस्थितीत खराब कोलेस्ट्रॉल तुमच्या शरीरात जमा होत नाही. इतकंच नाही तर याच्या सेवनाने शरीरात रक्तातील साखर वाढत नाही.