मुंबई : अनेकांना आहारात दह्याचा वापर करणं ही नेहमीची सवय झाली आहे. भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये दह्याचा आहारात नियमित वापर केला जातो. मात्र वातावरणात होणार्‍या बदलांनुसार आहाराचं पथ्यपाणी सांभाळणंदेखील गरजेचे आहे. अनेकांना पावसाळ्यात दही खाल्ल्याने त्रास होऊ शकतो हे ठाऊकच नाही. त्यामुळे या दिवसात अनेक लहान सहान आजारांचा त्यांना सामना करावा लागतो.  


 पावसाळ्यात दह्याचे सेवन का ठरते नुकसानकारक ?  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयुर्वेद एक्सपर्टच्या सल्ल्यानुसार, पावसाळ्याच्या दिवसामध्ये दही खाणं हे आरोग्याला त्रासदायक ठरू शकतं. दही बनवण्यासाठी आवश्यक बॅक्टेरिया पोटाला नुकसानकारक ठरतात. दह्यामध्ये प्रोटीन घटक मुबलक असतात. त्यामुळे पावसाळ्यात पित्त वाढायला कारणीभूत ठरणार्‍या घटकांचा आहारात समावेश करणं टाळा. 


दही थंड प्रवृत्तीचं असतं. पावसाळ्यात वातावरणही थंड असल्याने प्रामुख्याने शरीरात उर्जा आणि उष्णता वाढवणारे काही पदार्थ खाण्याकडे अधिक भर द्यावा.  पावसाळ्यात पचनशक्ती कमजोर होते. त्यामुळे पोटात गॅस निर्माण होतो. त्यामुळे पचायला त्रास होईल किंवा अधिक वेळ लागेल अशा पदार्थांचा आहारातील समावेश टाळावा. 


पावसाळ्यात आहारात दह्याचा समावेश कसा कराल ? 


पावसाळ्याच्या दिवसात दही खाण्याची इच्छा होत असेल तर लस्सीचा पर्याय उत्तम आहे. आयुर्वेदानुसार, पावसाळ्यात शरीरात वात वाढण्याची, पित्त होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे पावसाळ्यात दही टाळण्याचा सल्ला दिला जातो. रात्री दही खाणं टाळणंच अधिक फायदेशीर आहे. यामुळे पचनशक्ती सुधारते. परंतू अगदीच इच्छा झाल्यास लस्सी किंवा ताक प्यावे. 


कोणी टाळावे दही? 


सर्दी, खोकला, अस्थमा, कफाचा त्रास असणार्‍यांनी दह्याचा आहारातील समावेश टाळावा. पित्त किंवा अलसरचा त्रास असेल तरीही या दिवसात दही टाळा. अन्यथा  हा त्रास अधिक बळावतो. पचनशक्तीवर त्याचा परिणाम होतो. शरीरात सूज असेल तरीही दही खाणं टाळा.