झटपट रंगणार्या मेहंदीची निवड करण्यापूर्वी जाणून घ्या `धोके`
श्रावण माहिना सुरू झाला की सणवारांची रेलचेल सुरू होते.
मुंबई: श्रावण माहिना सुरू झाला की सणवारांची रेलचेल सुरू होते. नागपंचमी, रक्षाबंधनाच्या दिवसांमध्ये मुली प्रामुख्याने मेहंदी काढतात. अनेकजणी धावपळीच्या दिवसात स्वतः घरी मेहंदी काढण्यापेक्षा बाजारात किंवा मॉलमध्ये झटपट मेहंदी काढण्याचा निर्णय घेतात. झटपट रंगणारी, गडद होणारी मेहंदी म्हणून तुम्ही बाजारात कलाकारांकडून मेहंदी काढून घेत असाल तर वेळीच सावध रहा. कारण मेहंदीमध्ये ती रंगण्यासाठी काही केमिकल्सचा वापर केला असेल ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
नुकसानकारक मेहंदी
मेहंदी नैसर्गिक स्वरूपात हातावर लावल्यास त्याचा आरोग्याला फायदा होतो. मात्र जर झटपट रंगण्यासाठी त्यामध्ये केमिकल्स मिसळले असल्यास त्यामधून त्वचेला नुकसान होऊ शकते. त्वचेवर जळजळ, खाज, सूज येणं अशी लक्षण प्रामुख्याने आढळतात.
कॅन्सरचा धोका
मेहंदी खुलण्यासाठी घातक केमिकल्स, रासायनिक पदार्थांचा वापर केल्यास त्यामधून कॅन्सरचा धोका बळावू शकतो. पीपीडी सोबतच अमोनिया,ऑक्सिडेटीन, हायड्रोजनसारखे घातक केमिकल्स मिसळल्यास त्वचेला नुकसान होऊ शकते. मेहंदीमध्ये पीएच अॅसिड असल्यास ते अधिक त्रासदायक ठरू शकतं.
हर्बल मेहंदी सुरक्षित
सणांमध्ये मेहंदी हातावर काढणार असाल तर हर्बल मेहंदीचा समावेश करा. यामुळे शरीरात थंडावा रहण्यास मदत होते. हर्बल मेहंदी हातांना सुंदर बनवते.
खास काळजी
पुरेशी काळजी घेऊन बाजारातून मेहंदी घेतली तरीही काहींना अॅलर्जीमुळे त्याचा त्रास होऊ शकतो. हातावर मेहंदीमुळे काही त्रास होत असल्यास तात्काळ हात थंड पाण्याने धुवाव. त्यानंतर खोबरेल तेल लावा. त्रास कमी न झाल्यास डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्यावा.