मुंबई : बरेचदा आरोग्यवर्धक अशी रेडी टू ड्रिंक पेयाची आकर्षक जाहिरात पाहून त्याच्या जाळ्यात अडकतात. पण दिसायला आकर्षक वाटत असली तरीही ही पेयं आरोग्याला हितावह असतीलच असे नाही. रेडी टू ड्रिंक पेयांबद्दल  मधुमेहतज्ञ डॉ. रोशनी प्रदिप गाडगे यांनी दिलेला हा खास सल्ला नक्की जाणून घ्या. 


रेडी टू ड्रिंक पेयांमध्ये काय असते ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेडी टू ड्रिंक पेयांमध्ये कृत्रिम द्रव पदार्थ बनविण्यासाठी केमिकल्स, साखर, कार्बोहायड्रेड, कॅलरीजचे प्रमाण अधिक असते. या पेयांमध्ये साखर, मीठ अधिक असल्याने आरोग्यास हानिकारक आहेत. नेहमीच्या पेयांपेक्षा यामध्ये साखरेचे प्रमाण किमान दहापट अधिक असल्याने मधुमेहींनी यापासून दूर राहणंच अधिक हितावह आहे. 


घातक ठरू शकतात हे घटक 


कृत्रिम शीतपेयांमध्ये प्रामुख्याने फॉस्फरिक अ‍ॅसिड, कॅफीन, घातक कृत्रिम रंग, कार्बन डायऑक्साईड, अ‍ॅल्युमिनियम आदींचा वापर प्रामुख्याने असतो. फॉस्फरिक अ‍ॅसिडमुळे शरीरातील पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम यांचे प्रमाण बिघडते. 


कोणकोणत्या आजारांना मिळू शकते आमंत्रण ? 


हाडातील कॅल्शियम रक्तात येऊन बाहेर जात असल्याने आर्थरायटिस, मूतखडा, रक्तवाहिन्या कठीण होणे आदी विकार जडण्याची शक्यता असते. 


 दात, मणके, कमरेची हाडे ठिसूळ होणे हे दुष्परिणाम तर होतातच. लहान मुलांमध्ये हायपर ऍक्टीव्ह तर गरोदर महिलांनी अशा पेयांच सेवन केल्यास बाळाला व्यंग होण्याची शक्यता असते.  सोडीयम बेंझाएटच प्रमाण असलेल्या द्रव पदार्थांच्या अतिसेवनाने अस्थमा अटॅक, रक्तदाब वाढणे, किडनी निकामी होणे, जीवघेणी एलर्जीची रिएक्शन होण्याची शक्यता असते. 


द्राक्ष व टोमॅटो द्रव पेयांमध्ये मोनो सोडीयम ग्लुटामेट्सचा वापर असल्याने याची चव मिठाप्रमाणे असते व हा घटक अधिक आकडीचे आजार, मायग्रेन, मेंदूच्या रक्तवाहिन्यांना धोका तसेच मानसिक आजाराला कारणीभूत ठरू शकतो.


गंभीर धोका 


शीतपेयांवर वारंवार झालेल्या संशोधनानुसार, व्यक्ती जर सातत्याने शीतपेयाचे सेवन करीत असेल तर त्यात असलेल्या साखरेच्या अतिप्रमाणामुळे मधुमेहासारखा गंभीर आजार जडू शकतो. कोणतेही ३५० मिलीलिटर (ज्यामध्ये ३१.५ ग्रॅम साखर असते.) शीतपेय एकावेळी घेतल्यास Diabetes-2 प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता २०% बळावते. शर्कराविरहित पेय अथवा आईस्क्रिम यामध्ये अँस्पोर्टेन या घटकाचे प्रमाण असल्याने कर्करोग होण्याची शक्यता असते. तसेच पोटाचे विकार होण्याचीही शक्यता असते.


 हेल्दी पर्याय कोणता 


कोणतेही पेय जे कृत्रिमरितीने बनविले आहे ते आरोग्यास धोकादायकच आहे,  तरीही तुम्ही अशा पेयांचे सेवन करण्यापुर्वी त्यावर दिलेली माहिती काळजीपुर्वक वाचने आवश्यक आहे. कोणत्याही फळाचं रस करून पिण्यापेक्षा ते फळ तसेच खाणे हे आरोग्यास चांगलेच आहे. कारण, रसांच्या स्वरूपात शरीरात जाणा-या कॅलरींचे प्रमाण अधिक व कर्बोदके कमी अशते. लहान मुलांसाठी फळांचा पल्प बनवून देणे नेहमीच चांगले ठरते.  त्याचप्रमाणे घरी बनविलेले लिंबू पाणी, कोकम सरबत हे आरोग्यास नेहमीच चांगले.  मधुमेह असणा-या रूग्णांसाठी मात्र कोणतेही पेय आरोग्यास पुरक नाहीत.