मुंबई : भारतीय संस्कृतीमध्ये हातांना मेहंदी लावल्याशिवाय कोणताही समारंभ पूर्ण होत नाही. लग्नात नवरीच्या हातावर मेहंदी काढणे हा तर एक खास सोहळाच झालेला आहे. पांढरे केस लपवण्यासाठीही मेहंदी लावली जाते. पण या मेहंदीचेही दुष्परिणाम होतात हे तुम्हांला ठाऊक आहे का ?


मेहंदीने खरंच दुष्परिणाम होतात का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी दिल्ली येथील सरोज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील वरिष्ठ सल्लागार, त्वचारोगतज्ज्ञ तसेच विभागप्रमुख डॉ. अनिल गंजू यांच्या मते, शुद्ध हिरव्या रंगाची मेहंदीलावल्याने कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाहीत. केवळ संवेदनशील त्वचा असणाऱ्यांमध्ये मेहंदीचा त्रास होऊ शकतो. यासोबतच काळ्या किंवा तपकिरी रंगाची मेहंदी लावणे हानीकारक आहे.


मेहंदीचे दुष्परिणाम –


त्वचारोग –


मेहंदी जरी नैसर्गिकरित्या मिळत असली तरी, काहीवेळा कमी कालावधीमध्ये अधिक गडद रंगण्यासाठी तिच्यात PPD (पॅरा-फेनिलीनडायअमाइन)मिसळतात. बऱ्याच जणांना हे माहीत नसते की, PPD त्वचेच्या संपर्कात आल्याने अॅलर्जी होऊ शकते. उदा.; खाज येणे, लालसर होणे, आग होणे किंवा सूज येणे.


केसांना शुष्कता –


केसांना लावण्याची मेहंदी तयार करताना त्यामध्ये अनेक घातक रासायनिक घटक मिसळल्यामुळे केस शुष्क होतात. तसेच डोक्याला खाज सुटते, कधीकधी पुरळही येऊ शकतात.


डोळे लाल होतात –


मेहंदीचा डोळ्यांशी संपर्क आल्यास डोळे लाल होतात किंवा डोळ्यांतून पाणी येऊ लागते. अशा वेळी थंड पाण्याने डोळे धुवावेत व त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


लाल पेशी फुटणे –


ज्या मुलांना G6PD ची (6 ग्लुकोज फॉस्पेट डिहायड्रोजनेजची) कमतरता असेल त्यांच्या हातांना मेहंदी लावू नये. नाहीतर त्यांच्या शरीरातील लाल पेशी फुटून शारिरीक समस्या निर्माण होतील. असे काही झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


पोट बिघडणे –


कोणत्याही स्वरुपातील मेहंदी पोटात जाणे मानवी आरोग्यासाठी घातक असते. चुकूनही थोडीफार मेहंदी पोटात गेली तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


मेहंदीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी तज्ज्ञांचे सल्ले –


कधीही हातांना किंवा केसांना मेहंदी लावण्याअगोदर पॅचटेस्ट करावी.
मेहंदीमधील रासायनिक घटकांमुळे केस शुष्क होऊ नये म्हणून त्यापूर्वी केसांना तेल लावावे. 
मेहंदी लावल्यानंतर शाम्पू व कंडिशनरचा (शक्यतो आयुर्वेदिक) वापर करून केस स्वच्छ धुवावेत.
मेहंदी लावल्यानंतर खाज येणे, लालसर होणे, आग होणे किंवा सूज येणे अशी लक्षणे आढळल्यास लगेजच हात किंवा केस धुवून त्यावर Allegra किंवा Avil यांसारखे अॅलर्जी कमी करणारे औषध लावावे.
यांसारखी लक्षणे आढळल्यास घरीच कोणतेही तेल किंवा क्रिम न लावता त्वरित त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
पुढच्या वेळी मेहंदी लावताना या टिप्स लक्षात ठेवा म्हणजे त्यापासून होणार्‍या दुष्परिणांपासून तुमचा बचाव होऊ शकतो.