तणावामुळे उद्भवू शकतात त्वचेच्या या ६ समस्या!
तणावाचा परिणाम मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी होतो.
मुंबई : आजकालच्या बदललेल्या आणि व्यस्त जीवनशैलीत आपला जास्तीत जास्त वेळ ऑफिसमध्ये जातो. त्यात कामाचा व्याप आणि टार्गेट्सचा ताण यामुळे टेन्शन येणे स्वाभाविकच आहे. तणावाचा परिणाम मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी होतो. तणावातूनच मानसिक समस्या वाढू लागतात. पण तणावामुळे त्वचेच्या समस्या उद्भवतात, हे तुम्हाला माहित होते का? चेहर्यावर एखादा जरी पिंपल वाढताना दिसला तरीही अनेकदा तरूण मंडळी बैचेन होतात. अनेकांचा असा विश्वास आहे की, ताणतणावामुळे अॅक्ने वाढतात. तर तणावाचा परिणाम त्वचेवरही होतो. जाणून घेऊया त्याबद्दल...
कोरडी त्वचा
तणावामुळे सक्रीय होणारे हार्मोन्स नसा आकुंचित करतात. त्यामुळे रक्तसंचार बिघडतो. त्वचेपर्यंत रक्तपुरवठा नीट होत नाही. परिणामी त्वचा कोरडी होते. त्वचेची जळजळ होते, खाज येण्याचे प्रमाण वाढते.
लाईकन सिम्प्लेक्स क्रॉनिकस
हा दाद चा एक प्रकार आहे. त्वचा कोरडी झाल्याने खाज येते. खेचली जाते. ही एक क्रोनिक समस्या आहे जी तणावासोबत वाढत जाते. मात्र तणावावर नियंत्रण ठेऊन तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता.
चकते
तणावामुळे त्वचेवर चकते येतात. त्याशिवाय मसालेदार खाण्याने, अतिशय गरम व थंड खाल्याने आणि अतिशय त्रासदायक कठीण काम केल्याने चकते येतात.
एक्जिमा आणि सोरायसिस
एक्जिमा आणि सोरायसिस हे आजार तणावामुळे होतात असे नाही. पण तणावपूर्ण जीवनशैलीमुळे त्वचारोग गंभीर होतात. तणावामुळे रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. परिणामी समस्या गंभीर रुप धारण करतात.
डार्क सर्कल
झोपेच्या कमतरतेमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात. ज्यास डार्क सर्कल म्हणतात. तणावात असल्याने चेहऱ्याजवळील रक्तप्रवाह कमी होतो आणि त्याचमुळे चेहरा निस्तेज दिसतो आणि डार्क सर्कल येतात.
अॅक्ने
प्रदुषणामुळे अॅक्ने होतात, असा आपला सर्वसाधारण समज आहे. पण जेव्हा तुम्ही तणावात असता तेव्हा शरीरात कॉर्टिसल नावाचे हार्मोन्स उत्पन्न होतात. ज्यामुळे सीबम (एक तेलयुक्त पदार्थ) उत्पन्न होतात. जे अॅक्नेचे प्रमुख कारण ठरते.