लंडन : एखाद्या आजारीची लक्षणं दिसली की आपण निदान करण्यासाठी तातडीने तपासणी करतो. मात्र इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एका महिलेच्या म्हणण्याप्रमाणे, कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची माहिती तिला तिच्या पाळीव कुत्र्याकडून मिळाली. लॅब्रडॉर जातीच्या या कुत्र्याने वास घेत आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर असल्याची जाणीव करून दिल्याचा महिलेने दावा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या 46 वर्षीय महिलेचं म्हणणं आहे की, तिला तिच्या पाळीव कुत्र्याद्वारे ब्रेस्ट कॅन्सरची माहिती मिळाली. हा पाळीव कुत्रा लॅब्राडोर प्रजातीचा होता. महिलेचा दावा आहे की, कुत्र्याने कॅन्सर असल्याची जाणीव करून देत तिचे प्राण वाचवले.


'मिरर यूके'मध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे, अॅना नेरी असं या महिलेचे नाव असून ती इंग्लंडमधील वेस्ट यॉर्कशायरमध्ये राहते. नेरीने सांगितलं की, तिचा पाळलेला कुत्रा हार्वे अचानक विचित्र वागू लागला होता. त्यानंतर तिने तिच्या स्तनाची तपासणी केली आणि तिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं आढळून आलं.


नेरी दोन मुलांची आई आहे. ती पुढे म्हणते, एकदा ती तिच्या घरी सोफ्यावर बसली होती तेव्हा हार्वे तिच्याकडे आला आणि माझ्या शरीराचा वास घेण्यास सुरुवात केली. यानंतर त्याने दोन-तीन वेळा माझ्या छातीवर डोकं आपटलं. यावेळी तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता.


सुरुवातीला नेरीला ही एक सामान्य घटना वाटली. परंतु जेव्हा हार्वेने सलग सहा आठवडे असं वागणं सुरू ठेवल्यानंतर ती सतर्क झाली. ती डॉक्टरांकडे गेली  आणि तपासणीनंतर तिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं समजलं. तिचा कॅन्सर तिसऱ्या टप्प्यात पोहोचला होता.


सोशल मीडियावर ही गोष्ट शेअर करताना नेरी म्हणाली की, मी हार्वेची खूप आभारी आहे. त्याच्यामुळे या दुर्धर आजाराबद्दल मला वेळेत कळू शकलं. त्याचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही.