Chicken Noodles: बाहेरुन जेवण मागवल्यानंतर कमी पडू नये असा विचार करुन अनेकदा अधिकचं जेवण मागवलं जातं. अशा वेळेस सगळे मागवलेले पदार्थ संपले नाहीत तर उरलेलं हे जेवण फ्रिजमध्ये ठेवून नंतर गरम करुन त्याचं सेवन केलं जातं. मात्र तुम्हालाही अशी सवय असेल तर तुम्ही ही बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा. उरलेलं जेवणं फ्रिजमध्ये ठेऊन ते नंतर खाण्याची सवय एका मुलाला फारच महागात पडली. तुमच्याबरोबरचही अगदी दैनंदिन जीवनाचा भाग असणारी महागात पडण्याचा प्रकार घडू शकतो.


एका चुकीचा फटका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिळे अन्नपदार्थ तुमच्याही आयुष्यातील अविभाज्य भाग असेल किंवा तुम्हीही जवळजवळ दररोज असं उरलेलं शिळं अन्न खात असाल तर वेळीच सावध व्हा. कारण शिळं अन्न खाण्याची ही सवय तुम्हाला अपंगत्वाचा कधीही न विसरता येणारा श्राप देऊ शकते. केवळ तुम्हाला घाबरवण्यासाठी असं म्हणत नसून एका मुलाबरोबर खरोखरच असा प्रकार घडला आहे. खरं तर ही घटना काही महिन्यांपूर्वी घडली असली तरी भारतासारख्या देशात शिळं अन्न खाणाऱ्यांचं प्रमाण पाहता यासंदर्भात जास्तीत जास्त लोकांना माहिती असणं आवश्यक आहे. हॉस्टेलमध्ये राहणारे किंवा एकट्याने राहणारे अनेकजण रात्रीचं जेवण बाहेरुन मागवतात. एका मुलाने अशाच प्रकारे चिकन नूडल्स मागवल्या. मात्र त्यानंतर त्याने केलेल्या एका चुकीमुळे त्याला स्वत:च्या पायाने चालणंही कठीण झालं. 'न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन'च्या अहवालाच्या आधारे 'लॅडबायबल'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.


नेमकं घडलं काय?


ज्या मुलाबरोबर हा विचित्र प्रकार घडला त्याचं नाव जेसी असल्याचं 'लॅडबायबल' म्हटलं आहे. जेसीच्या मित्राने रेस्तराँमधून चिकन नूडल्स मागवल्या. जेसीच्या मित्राने त्याला हवे तेवढे नूडल्स खाल्ले आणि उरलेले फ्रिजमध्ये ठेऊन दिले. दुसऱ्या दिवशी जेसीने हेच नूडल्स खाल्ले. जेसीने हे नूडल्स खाल्ल्यानंतर काही वेळाने जेसीचं अंग तापाने फणफणू लागलं. त्यानंतर जेसीच्या हृदयाचे ठोके वाढले आणि हृदयाच्या ठोक्यांची गती 166 ठोके प्रती मिनिट इतकी वाढली. जेसीची प्रकृती खालावल्याचं पाहून त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी भूल देऊन जेसीला बेशुद्ध केलं. नूडल्स खाल्ल्यानंतर जेसीच्या पोटात दुखू लागलं. त्याला पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्याचं शरीर निळं पडलं.


26 दिवसांनंतर शुद्धीवर आला पण...


डॉक्टरांनी केलेल्या वेगवेगळ्या चाचण्यांमधून अन्नपदार्थाच्या माध्यमातून जेसीला बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्याचं निष्पण्ण झालं. त्याच्या संपूर्ण शरीरामध्ये सेप्सिसचं इन्फेक्शन पसरलं. जेसीची किडनी निकामी झाली. सेप्सिसचं इन्फेक्शन वेगाने शरीरभर पसरलं. हे इन्फेक्शन पसरु नये म्हणून डॉक्टरांनी त्याच्या हाताची बोटं आणि गुडघ्या खालून पाय कापले. तब्बल 26 दिवसांनंतर जेसी शुद्धीवर आला. शुद्धीवर आल्यानंतर आपलं आयुष्य कायमचं बदलून गेल्याचं जेसीच्या लक्षात आलं. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, शिळं आणि दुर्गंधीयुक्त नूडल्स खाल्ल्याने जेसीची ही अवस्था झाली.