वजन वाढण्याची काही महत्वाची कारणे
वजन अचानक वाढणे, किंवा वाढत राहण्याची अनेक कारणं आहेत, ती आपण नेहमी तपासून पाहिली पाहिजेत.
मुंबई : वजन अचानक वाढणे, किंवा वाढत राहण्याची अनेक कारणं आहेत, ती आपण नेहमी तपासून पाहिली पाहिजेत, किंवा त्याविषयी निरीक्षण नेहमीच नोंदवत राहिलं पाहिजे, यामुळे तुम्हाला वजन वाढण्याची नेमकी कारणं तरी कळतील, यामुळे तुम्हाला वजन पुन्हा कसं नियंत्रणात आणता येईल, हे देखील कळेल.
आहारातील समतोल
खाणं आणि कॅलरी बर्न करणं या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल राखणं गरजेचं आहे. जर याचा समतोल राखला नाही तर वजनात बदल होतो. तुम्ही जास्त खाल्लं आणि कमी प्रमाणात कॅलरी बर्न केल्या तर वजन वाढण्याची शक्यता असते.
नियमित व्यायाम
व्यायाम किंवा वर्कआऊट केल्याने त्या व्यक्तीचं ६ ते १० टक्के वजन घटण्याची शक्यता असते. याचं कारणं अतिप्रमाणात येणारा घाम. मात्र अशावेळी वजन मोठ्या प्रमाणात कमी होत नाही, तर थोडासा फरक दिसून येतो.
आजारांमुळे वजनात बदल
आजारपणाचा अनपेक्षितरित्या वजनावर परिणाम होतो. कॅन्सर, मधुमेह, हार्ट फेल्युअर किंवा साधी सर्दी या आजारांमुळे वजनात बदल होतात. आजारपणानंतंर वजनात जर अतिप्रमाणात बदल दिसून येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
काही औषधांमुळे वजनात घट
अॅन्टी इन्फ्लामेटरी सारख्या काही प्रकारच्या औषधांमुळे रूग्णाच्या वजनात घट होते. तर इन्सुलिन, अॅन्टी-डिप्रेसंट, अॅन्टी-एपिलेप्टीक या औषधांच्या वापराने वजनात वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणतीही औषधं घेताना त्या औषधांचा शरीरावर आणखी कोणता परिणाम होऊ शकतो हे डॉक्टरांना विचारून घ्या.
पुरेसं पाणी न प्यायल्याने
आपल्या शरीरात ५५ ते ७५ टक्के पाणी असतं. जर शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली तर डोकेदुखी तसंच त्वचा कोरडी पडणे अशा समस्या उद्भवतात. यासोबतचं तुमच्या वजनात देखील अचानक घट होऊ शकते.
मीठाचा अतिवापर
आहारात मीठाचं अतिप्रमाण हृदयाच्या आरोग्यासाठी घातक ठरतं. यामुळे शरीरातील पाण्याच्या पातळीवर परिणाम होऊन वजन वाढण्याचा धोका असतो. तसंच ज्या व्यक्तींच्या आहारात सोडियमचं प्रमाण जास्त असतं त्या व्यक्ती बाहेरील तसंच प्रकिया केलेले पदार्थ जास्त खातात. ज्यामध्ये शरीरातील चरबीचं प्रमाण वाढून वजनही वाढतं.
झोपण्याच्या पद्धती
अभ्यासांच्या माध्यामातून तुम्ही किती वेळ झोपता किंवा कमी झोप घेता यांचा परिणाम वजनावर होत असल्याचं आढळून आलंय. जर तुम्ही पुरेशी झोप घेतली नाही तर सकाळी तुम्हा जास्त भूक लागते. ज्यामुळे तुम्ही जास्त प्रमाणात खाता. परिणामी वजन वाढतं.