मुंबई : आपल्याला अनेक आजारांबद्दल माहिती असते. पण मेंदूच्या, डोक्याच्या आजारांबद्दल आपण कमी जागृक असतो. यातील सर्वात गंभीर आजार म्हणजे ब्रेन ट्यूमर. कारण याचा अंदाजच लागत नाही आणि जेव्हा कळते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात प्रत्येक वर्षी ४०-५० हजार लोकांना ब्रेन ट्यूमरचे निदान होते. यामध्ये सर्वाधिक संख्या लहान मुलांची आहे. मुलांमध्ये ब्रेन ट्युमरचे प्रमाण सुमारे २०% आहे. तज्ञांनुसार, ब्रेन ट्युमरची लक्षणे ट्युमरच्या स्थितीवरुन ठरतात. ट्युमरचे मेंदूच्या त्या भागात असेल ज्या भागात डोळे, हाता-पायाचे नियंत्रण होते तर शरीरातील ते भाग कमजोर होऊ लागतात.


पाहुया नेमकी काय आहेत ब्रेन ट्युमरची लक्षणे...


सारखे सारखे डोके दुखणे


सामान्यपणे डोकेदुखी हा ट्युमरचा संकेत मानला जातो. पण खरंतर डोकेदुखी मोठा ट्युमर असताना जाणवते. ट्युमरच्या सुरुवातीच्या स्टेजला डोकेदुखी जाणवत नाही. 


चालताना अचानक झटका लागणे


कोणत्याही प्रकारच्या ट्युमरमध्ये हे सुरुवातीचे लक्षण असते. मेंदूतील ट्युमरमुळे न्युरॉन्स अनियंत्रित होतात. त्यामुळे व्यक्तीची हालचाल सामान्य राहत नाही. या स्थितीत पूर्ण शरीराबरोबरच कोणत्याही एका अंगाला झटका लागल्यासारखे वाटू शकते.


अचानक तोल जाणे


जर तुम्ही वस्तू नीट उचलू शकत नसाल किंवा पायऱ्या नीट चढू शकत नसाल. तुमचा तोल जात असेल तर ही धोक्याची घंटा आहे. बोलणे, गिळणे किंवा चेहऱ्यावरील हावभाव नियंत्रित करु न शकणं, हे देखील याचेच लक्षण आहे.


कोणताही एक भाग सुन्न होणे  


शरीरातील कोणताही भाग किंवा चेहरा सुन्न पडत असेल तर त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण जेव्हा ट्युमर ब्रेन स्टेममध्ये असतो, तेव्हा ही समस्या उद्भवते. 


स्मरणशक्ती कमी होणे


ट्युमरमुळे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तित्त्व बदलते. ट्युमर असलेल्या व्यक्ती अनेक गोष्टी विसरू लागतात. संभ्रमात असतात. त्यांना लहानशी गोष्टीही त्रास देते. 


उलटीसारखे होणे


पोट खराब होत असल्यास किंवा उलटीसारखे वाटत असल्यास हे देखील काळजीचे कारण ठरेल. असे सातत्याने होत असल्यास आणि या समस्येचे कारण स्पष्ट होत नसल्यास ही चिंतेची बाब आहे.


अंधुक दिसणे


अंधुक दिसणे, डबल दिसणे किंवा दृष्टी जाणे, हे ट्युमरचे लक्षण आहे. काही चिन्ह किंवा निशाण देखील दिसू लागतात.