व्हॅलेंटाईन डे साजरा करताना `ही` काळजी जरूर घ्या
रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे, सगळे या आठभरात चालू असलेले डे आणि
मुंबई : रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे, सगळे या आठभरात चालू असलेले डे आणि
मग उद्या आला आहे व्हॅलेंटाईन डे अर्थात ज्याची आतुरतेने तरुणाई वाट पाहत आहे. बाजारात फेरफटका मारला असता प्रेमाच्या व्यक्तीला देण्यासाठी भेटवस्तू, फुले, ग्रिटिंग्स कार्ड अशा प्रेम व्यक्त करणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींची रेलचेल दिसत आहेच. आजकाल बरेच कपल्स (कॉलेजला जाणारी तरुणाई) हॉलिडे पॅकेजस बुक करताना दिसतात. प्रेम व्यक्त करण्यासाठी रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा ब्रेक म्हणून असा व्हॅलेंटाईन ब्रेक घेण्याची संकल्पना तरुणाईमध्ये रुजली आहे.
आपल्या प्रिय व्यक्तीसाठी काहीतरी वेगळे, काहीतरी स्पेशल करावे ह्या विचारातून अनेक प्रकारे व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन करत असतात. कॉलेजला जाणाऱ्या तरुणाईमध्ये प्रेमाचा उत्साह, पहिले प्रेम, पहिला स्पर्श हा नेहमी आकर्षणाचा विषय असतो. हाच उत्साह आपल्या प्रिय व्यतीसाठी काहीतरी वेगळं करण्याची ओढ निर्माण करतो. डेट वर जाणे, फिरायला जाणे, नाईट आऊट्स ह्यातून मग अनेकदा प्रेमयुगुल खूप जवळ येणे, शारीरिक संबंध निर्माण होणे हे सर्वसाधारण झाले आहे. अनेकदा उत्साहाच्या भरामध्ये उचललेले हे पाऊल नंतर मनाला व शरीराला त्रासदायक ठरू लागते.
शारीरिक संबंध ठेवताना कोणती काळजी घ्याल?
खूप संभ्रम, विविध प्रकारची भीती, अपराधी भावना मनामध्ये घर करू लागतात. नीट माहिती नसताना, काळजी न घेता किंवा टीव्ही, इंटरनेट बघून अवाजवी रंजक कल्पना अपेक्षा ठेवून केलेल्या शारीरिक संबंधामुळे अनेक शारीरिक त्रास देखील होतात. आजकाल आपण सगळेच एकमेकांना भेटल्यावर शेक हँड करणे, मिठी मारणे सहज करतो. त्याचप्रमाणे शारीरिक संबध ही फार साधारण गोष्ट तरुणाईला वाटत असली तरी ते तसे नाही आहे. शारीरिक सबंध निर्माण होते तेव्हा शरीरात भरपूर रासायनिक हार्मोनल प्रकिया होतात तसेच मानसिक दृष्ट्या एक घट्ट कनेक्शन निर्माण होते.
शारीरिक संबंधाचा मनावर होणार प्रभाव
अनेक तरुण मंडळी हे मानसिक वगैरे काही होत नाही असे म्हणणारी देखील भेटतात. पण बौद्धिक दृष्ट्या असे वाटत असेल तरी शरीरातील, केमिकल्स, हार्मोन्स, अवचेतन मन ह्यात होणारे बदल अनेकदा लक्षात आलेले नसतात. त्यामुळे पूर्णपणे सारासार विचार केल्या शिवाय स्वतःचे शरीर कोणाला हाताळू देणे, समर्पित करणे फारसे योग्य नाही. त्यामुळे पूर्ण विचार करून हा निर्णय घ्या.
जवळीक करण्याचा निर्णय झाल्यानंतर देखील स्वच्छतेची काळजी घेणे ही आपली आपल्या शरीराप्रती असलेली जबाबदारी आहे. नीट काळजी न घेतल्याने लैंगिक संक्रमित रोगांचे (Sexually Transmitted Diseases) तसेच अवांछित गर्भधारणा (Unwanted Pregnancy) ह्यांचे प्रमाण वाढताना दिसते आहे. हे टाळण्यासाठी न विसरता निरोधकांचा (Condom) वापर करण्याचा सल्ला लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे. कारण हे आजार किंवा अवांछित गर्भधारणा ह्यासाठी नंतर घेतली जाणारी औषधे किंवा वैद्यकीय उपचार ह्याचे शरीरावर दुष्परिणाम होताना दिसतो. त्यामुळे अधिक काळजी घेणे केव्हाही उत्तम.
क्षणिक आनंद, मानसिक दबाव प्रियकर किंवा प्रेयसीचा हट्ट आहे म्हणून हा निर्णय घेऊ नका. शरीरावर मनावर कोणतेही कायमचे व्रण ओरखडे उठवून घेण्यायोग्य ही करणे नाहीत. त्यामुळे सारासार विचार करून हा निर्णय घ्या. स्वतःची, स्वतःच्या शरीराची, मनाची नीट जपणूक करा हाच सल्ला एक डॉक्टर म्हणून मी देईन.