शाकाहारींना चहाची चाहत ठरते धोकादायक? काय आहे सत्य?
चहाप्रेमींनो वेळीच व्हा सावध, शाकाहारींसाठी जास्त चहा घातक?, जाणून घ्या
Health News : आपल्याकडे चहा प्रेमींची कमतरता नाही, अनेकांचा तर चहाशिवाय दिवसच सुरू होत नाही. काहींना तर चहाचा घोट घेतला नाहीतर डोकेदुखी आणि थकव्याचा सामना करावा लागतो, त्यामुळे ते चहा घेतात. पण काहींना मात्र चहा पिण्याची विचित्र सवय असते. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत 5 ते 6 चहा घेतात. मात्र चहाच्या अतिसेवनामुळे आरोग्याला मोठं नुकसान होऊ शकतं. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार दिवसाला किती चहा घेतला पाहिजे जाणून घ्या.
चहामध्ये कॅफिन असते, जे आरोग्यासाठी चांगलं मानलं जात नाही, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. ते चहापत्तीच्या पानांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतं की कोणत्या ब्रँडमध्ये किती कॅफिन असेल. सहसा 1 कप चहामध्ये सुमारे 60 मिलीग्राम कॅफिन असते. त्यानुसार एका दिवसात 3 कपपेक्षा जास्त चहा पिणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
जास्त चहा पिण्याचे तोटे
जर तुम्ही एका दिवसात 4 किंवा त्यापेक्षा जास्त कप चहा घेत असाल तर त्यामधील टॅनिन तुमच्या शरीरातील लोह शोषण्याची क्षमता कमी करते. त्यामुळे जे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी चहाचं जास्त सेवन करण्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
चहामध्ये कॅफीनचे प्रमाण खूप जास्त असते, ज्याचा आपल्या मेंदूवरही परिणाम होतो. त्यामुळे आपल्याला चक्कर येऊ शकते म्हणून बहुतेक आरोग्य तज्ज्ञ चहाचं जास्त सेवन टाळण्याचा सल्ला देतात.
जर तुम्ही दिवसातून 5 ते 10 कप चहा घेत असाल तर अॅसिड रिफ्लक्सची समस्या वाढते. त्यामुळे तुमच्या छातीत जळजळही होऊ शकतं.
चहामुळे तुम्हाला ताजंतवाणं वाटतं, ज्यामुळे तुम्ही टेन्शनशिवाय दिवसभरातील काम करू शकता. परंतु जर तुम्ही ठराविक अंतराने चहा पित राहिलात तर झोप न येण्याची समस्याही उद्धवू शकते. त्यामुळे चहाप्रेमींनी याची काळजी घ्यायला हवी आणि आपल्या चहा पिण्यावर ताबा ठेवायला हवा.