मुंबई : नुकतंच मुंबईमध्ये एका महिला डॉक्टरला 3 वेळा कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. तर आता दिल्लीमध्येही एका 61 वर्षीय डॉक्टरला 3 वेळा कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या डॉक्टरांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले होते. त्यानंतरही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 


3 वेळा कोरोनाची लागण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्ट केअर फाउंडेशनने कोरोना रुग्णावर केलेल्या अभ्यासानंतर असा दावा केला आहे की, डॉक्टरांनी लस घेतल्यानंतर त्यांना प्रथम कोरोनाच्या अल्फा व्हेरिएंटची लागण झाली त्यानंतर डेल्टा व्हेरिएंटचाही संसर्ग झाला. दुसऱ्या वेळी त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयातही दाखल करावं लागलं. 


या डॉक्टरांना हायपोक्सिया अर्थात श्वासोच्छवासाची तक्रार होती. 7 आठवड्यांनंतर ते पूर्णपणे बरे झाला. ऑगस्ट 2020 मध्ये ही लस घेण्यापूर्वीच त्या डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे एकूण त्यांना तीन वेळा संसर्ग झाला आहे.


हार्ट केअर फाऊंडेशनच्या प्राथमिक तपासणीनुसार, 'जेव्हा तिसऱ्यांदा डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली तेव्हा त्याला डेल्टा व्हेरिएंटची लागण झाली. कोरोनाची पुष्टी करणारी आरटी-पीसीआर चाचणीमधील सीटी काऊंट इतका कमी होता की त्याचा संसर्ग खूप जास्त असल्याचं दिसत होते. म्हणूनच, लस घेतल्यानंतर देखील कोविडच्या प्रोटोकॉलचं पालन अर्थात मास्क घालणं, सोशल डिस्टंसिंग तसंच वारंवार हात धुणं केलं पाहिजे.


इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या मताप्रमाणे, कोरोना पुन्हा संसर्ग होण्याचा धोका 4.5 टक्के आहे. जर एखाद्याला 102 दिवसांच्या अंतराने संसर्ग झाला असेल तर तो नवीन संसर्ग मानला जातो. त्याचवेळी, लस घेतल्यानंतरही जर कोणाला संसर्ग झाला तर त्याला ब्रेक थ्रू इन्फेक्शन म्हणतात.