मुंबई : कोरोनाच्या विषाणूने शिरकाव केल्यानंतर याचा फटका अनेकांना विविध पद्धतीने बसला. आता कोरोनाचा जोर ओसरताना दिसतोय. त्यामुळे आता राज्यात निर्बंध देखील शिथिल करण्यात येत आहेत. अशातच रूग्णसंख्येत फारशी वाढ होत नसली तरीही 11 ते 20 वयोगटातील मुलांना गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

11 ते 20 वयोगटातील 1 हजार 711 मुलं गेल्या 20 दिवसांमध्ये कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलं बाधित होण्याचं प्रमाण काही अंशी वाढलं असलं तरीही या वयोगटामध्ये मृत्यूचं किंवा गंभीर रुग्णांचं प्रमाण वाढलं नसल्याने अधिक चिंता करण्याची गरज नाही असं मत  तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.


लहान मुलांना लस अजून उपलब्ध झालेली नाही. त्यात शाळा, महाविद्यालयेही सुरू झाली आहेत. त्यामुळे 11 ते 20 वयोगटातील मुलांच्या बाधित होण्याच्या प्रमाणामध्येही वाढ झाली असल्याची शक्यता आहे. दरम्यान जानेवारीपासूनच मुलांचं लसीकरण होणार असून शाळांशाळांमधून लसीकरण करण्याबाबत विचार सुरू आहे. 


दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या माहितीप्रमाणे, राज्यात 11 ते 20 वयोगटातील मुलांमध्ये कोरोनाचं प्रमाण वाढलं आहे. लहान मुलांना कोरोनाचा एकमेकांना संसर्ग होत असल्याने कोरोनाची आकडेवारी वाढत आहे. या मुलांचं लसीकरण तातडीने केलं पाहिजे असं टास्क फोर्सचही मत आहे.


लहान मुलांचं लसीकरण आणि ज्येष्ठांना बूस्टर डोस देण्याची मागणी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय.


दिवाळीनंतर दुसऱ्या सत्रात शाळेचे सर्वच वर्ग भरवण्याची मागणी आता पालकांकडून होऊ लागली आहे. त्यामुळे 5 वी पासून पुढील वर्ग आधीच उघडले असून 1 ली ते 4 थी पर्यंतचे वर्ग भरवण्यास शिक्षण विभागाला आरोग्य विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आलं असून याबाबत आता मुख्यमंत्री निर्णय घेतील, अशी महत्त्वाची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.