मान्सुन ऋतूमध्ये हवामानातील बदलामुळे सांधे किंवा स्नायूसंबंधीत वेदना तसेच विविध आरोग्य समस्या उद्भवू शकतात. पावसाळ्यात सांधेदुखी, स्नायूंमधील वेदना, ऑस्टियोआर्थरायटिस आणि सांधे कडक होणे आणि दुखणे यासारख्या अनेकांना सांधे-संबंधित समस्या जाणवतात. बदलते हवामान, वातावरणाचा दाब कमी होणे आणि वातावरणातील आर्द्रता यासारख्या विविध कारणांमुळे पावसाळ्यात सांधे आणि स्नायूंसंबंधी वेदना होऊ शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी मुंबईतील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. अभय चालानी यांच्या सांगण्यानुसार, हवामानात वारंवार होणारे बदल आणि मुसळधार पावसामुळे वातावरणाचा दाब कमी होतो. यामुळे तुमच्या सांध्यातील द्रवपदार्थाचा विस्तार होऊन तुमच्या मऊ ऊतींमध्ये जळजळ आणि सूज निर्माण होते. पावसाळ्यात ओलावा आणि मुसळधार पावसामुळे रस्ते निसरडे होतात, ज्यामुळे पडण्याची आणि गंभीर दुखापत होण्याची शक्यता वाढते.


पावसाळ्यात होणाऱ्या दुखापती


डोक्याला होणारी दुखापत


पावसाळ्यात डोक्याला होणारी दुखापत ही डोक्याची कवटी, टाळू किंवा मेंदुला सूज तसेच मेंदू, रक्तवाहिन्या आणि डोक्यातील ऊतींना होणाऱ्या दुखापती किंवा आघातामुळे होऊ शकते. पावसाळ्यात निसरड्या, ओल्या फरशीमुळे डोक्याला दुखापत होण्याची शक्यता वाढते. मेंदूला झालेली दुखापत ही एक गंभीर चिंतेची बाब आहे आणि त्यासाठी तत्काळ वैद्यकीय लक्ष देण्याची गरज आहे, कारण उशीराने होणारे निदान हे जीवघेणे ठरू शकते.


फ्रॅक्चर 


फ्रॅक्चर ही विविध व्यक्तींना भेडसावणारी एक सामान्य समस्या आहे, जेव्हा अचानक धक्का बसल्यामुळे किंवा आघातामुळे हाडांना दुखापत होते किंवा हाडे मोडतात. हाडांचे फ्रॅक्चर अत्यंत वेदनादायक असू शकतात आणि काही प्रकरणांमध्ये रक्तस्त्राव देखील होऊ शकतो. फ्रॅक्चर बरे होणे हे त्याचे स्थान, तीव्रता, आकार आणि झालेले नुकसान यासारख्या विविध घटकांवर अवलंबून असते.


पाठीच्या कण्याला होणारी दुखापत


हे घडते जेव्हा कोणीतरी त्यांच्या पाठीवर अचानक पडते ज्यामुळे त्यांच्या पाठीच्या कण्याला खूप नुकसान होऊ शकते. पडल्यानंतर किंवा घसरल्यानंतर लगेच, तुमच्या पाठीच्या कण्याला धक्का बसू शकतो ज्यामुळे स्नायू आणि पाठीच्या हालचालींमध्ये अडचण येते, पाठ सुन्न होणे, सूज येणे आणि काही प्रकरणांमध्ये अर्धांगवायू देखील होतो. हर्निएटेड डिस्क, स्कोलियोसिस, ऑस्टिओपोरोसिस किंवा अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस यासारख्या पाठदुखीचा विशिष्ट वैद्यकीय इतिहास असलेल्या लोकांनी पावसाळ्यात त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे.


मऊ ऊतींना दुखापत


सॉफ्ट टिश्यूजला इजा (STI) जेव्हा अचानक दुखापत होते किंवा स्नायू, अस्थिबंधन किंवा स्नायुबंध यांचा अतिवापर होतो तेव्हा होते. हे असे जखमांचे प्रकार आहेत जे सुरुवातीला दिसत नाहीत परंतु कालांतराने लक्षणीय त्रास देतात. यामध्ये घोट्याच्या वेदना, मनगटातील मोच, गुडघ्याची दुखापत आणि अस्थिबंधनावर येणारा ताण यासारख्या समस्यांचा समावेश असतो. पुढील कोणतीही गुंतागुंत टाळण्यासाठी लक्षणे आणखी बिघडण्याआधी त्वरित कारवाई करणे आणि तत्काळ वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.


कापणे आणि जखम होणे 


कापणे आणि जखम होणे ही एक सामान्य समस्या आहे ज्याचा अनुभव अनेक व्यक्तींना येतो. शरीराच्या एका विशिष्ट भागावर थेट अथवा अचानक आघात झाल्यामुळे त्वचा फुगते किंवा रक्तस्त्राव सुरू होतो. प्रभावित भागात वेदना, सूज, त्वचेचा रंग बदलणे, लालसरपणा आणि अगदी तीव्र रक्तस्त्राव होऊ शकतो. संसर्ग आणि पुढील दुखापत टाळण्यासाठी तीव्र आणि गंभीर कट आणि जखमांच्या बाबतीत ताबडतोब डॉक्टरकडे जाणे आवश्यक आहे.


पावसाळ्यात पाय घसरणे आणि पडण्यासारखे अपघात टाळण्यासाठी टिप्स


  • फॅन्सी आणि चूकीची पादत्राणे ऐवजी टणक, मजबूत आणि आरामदायी पादत्राणे निवडा जे पावसाळ्यात पडणे आणि घसरण्यासारख्या अपघात टाळण्यास मदत करतात

  • अंधाऱ्या अथवा निसरड्या रस्त्यावरून जाताना विशेष आधार किंवा फ्लॅशलाइटचा वापर करा.

  • पावसाळ्यात असमान आणि ओल्या फरशीवरुन चालताना फोनचा वापर करणे टाळा.

  • खड्डे असलेल्या रस्त्यावरुन चालणे टाळा

  • ज्येष्ठ नागरिकांनी काठी किंवा वॉकर सारख्या आधाराचा वापर करावा.

  • ओल्या जिन्यावरुन चढताना अथवा उतरताना विशेष खबरदारी घ्या

  • घसरुन होणारे अपघात टाळण्यासाठी ओले जिने अथवा उरशी ताबडतोब पुसून कोरडी करा.