दिल्ली : गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाविरोधात लढा देतोय. दरम्यान कोरोनाच्या या लढाईत भारताने अजून एक मोठं पाऊल उचललं आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंट विरोधात लस तयार करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही लस mRNA वर आधारित आहे. हे तंत्र कोरोनाच्या सर्व व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचं आढळून आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी सांगितलं की, "आम्ही (Gennova) जेनोव्हाच्या mRNA आधारित लसीवर लक्ष ठेवून आहोत. ही लस पूर्णपणे स्वदेशी आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासही सोपी आहे. तसंच ही सामान्य तापमानातही सुरक्षित राहू शकते."


अमेरिकेमध्ये उपलब्ध असलेल्या इतर mRNA आधारित लसींप्रमाणे याला अतिरिक्त थंड तापमानाची आवश्यकता नाही. गरज भासल्यास, नवीन कोरोना व्हेरियंटशी लढा देण्यासाठी त्यात बदल आणि अपग्रेड केले जाऊ शकतात, असंही डॉ. पॉल यांनी सांगितलंय.


डॉ. पॉल यांच्या सांगण्यानुसार, Gennova जी लस तयार करतेय त्याची चाचणी सध्या सुरु आहे. लवकरच याच्या अंतिम चाचण्या होतील. दरम्यान, कंपनीने ओमायक्रॉन व्हेरिएंटचाव विचार करता मूळ लसीमध्ये आवश्यक बदलही केले आहेत. म्हणजेच कंपनीने समांतरपणे दोन कोरोना लस विकसित केल्या आहेत. एका भारतीय कंपनीने हे यश मिळवणं ही अभिमानाची बाब आहे.


mRNA वर आधारित लस ही केवळ सध्याच्या परिस्थितीत नव्हे तर भविष्यातही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण केवळ ओमायक्रॉनच नव्हे तर मलेरिया आणि डेंग्यूसारख्या आजारांवर प्रभावशाली असणार आहे, असं डॉ. पॉल यांनी सांगितलं.