Cancer Treatment: कॅन्सर एक असा आजार आहे, ज्याचं नाव ऐकून रूग्णांच्या पायाखालची जमीन सरकते. कॅन्सरवर उपचार घेतल्यानंतरही पुन्हा कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते. अशामध्ये मुंबईतील टाटा रूग्णालयातील तज्ज्ञांनी एका गोळीचा शोध लावला आहे. यासंदर्भात असा दावा केला जातोय की, दुसऱ्या वेळेस जर कॅन्सर होणार असेल, तर या गोळीमार्फत तो रोखला जाऊ शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्करोगाच्या उपचारानंतरही कॅन्सर अनेक रुग्णांमध्ये पुन्हा पसरण्याची शक्यता असते. टाटा रूग्णालयाच्या डॉक्टरांनी अभ्यास करून याचं कारण शोधून काढलंय. हे संशोधन टाटा हॉस्पिटलच्या ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर (ACTREC) हॉस्पिटल, खारघरचे डॉ. इंद्रनील मित्रा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं. त्यांच्या सांगण्यानुसार, आम्ही उंदरांवर संशोधन केलंय. मानवी कॅन्सरच्या पेशी उंदरांमध्ये सोडण्यात आल्या. त्यानंतर त्यांच्यामध्ये ट्यूमर तयार झाला.


यावेळी आम्ही रेडिएशन थेरेपी, कीमो थेरेपी आणि सर्जरीद्वारे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यानंतर कर्करोगाच्या पेशी नष्ट झाल्या. मरताना कर्करोगाच्या पेशीतील क्रोमॅटिन कण रक्तवाहिनीद्वारे शरीराच्या इतर भागांमध्ये पोहोचतात. हे शरीरातील चांगल्या पेशींमध्ये मिसळतात आणि त्यांचे कॅन्सरच्या पेशींमध्ये रूपांतर करतात. या संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की कर्करोगाच्या पेशी नष्ट होऊनही परत येऊ शकतात.


या समस्येवर उपाय शोधण्यासाठी डॉक्टरांनी उंदरांना रेझवेराट्रोल आणि कॉपरची एकत्रित प्रो-ऑक्सिडंट गोळी दिली. ही टॅब्लेट क्रोमोझोन तटस्थ करण्यासाठी प्रभावी होती. टाटाचे डॉक्टर जवळपास एक दशकापासून यावर संशोधन करत असल्याची माहिती आहे. ही टॅबलेट भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे.


कॅन्सरच्या उपचारांवर होणार फायदेशीर


टाटा मेमोरियल सेंटरचे माजी संचालक डॉ.राजेंद्र बडवे यांनी माहिती दिली की, कॅन्सरवरील उपचारात सुधारणा करण्यासाठी अधिक संशोधनाची गरज आहे. डॉ. मित्रा यांच्या संशोधनामुळे जगभरातील कॅन्सरवरील उपचार सुधारण्यास मदत होणार आहे.


टाटा मेमोरियल सेंटरमधील सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमिओलॉजीचे डेप्युटी डायरेक्टर डॉ. पंकज चतुर्वेदी म्हणाले की, समस्येचं मूळ शोधण्यासोबतच त्याचे निराकरण करणेही तितकंच महत्त्वाचं आहे. कॉपर-रेझवेराट्रोलसाठी घरगुती उपाय आहे. हे कॅन्सरवरील उपचार सुधारण्यात आणि उपचारादरम्यान होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी देखील उपयुक्त ठरतं.