पावसाळ्यात डोळ्यांचं इंफेक्शन टाळण्यासाठी काय कराल ?
पावसाळ्याच्या दिवसात वातावरणात झालेल्या बदलामुळे आरोग्यावर त्याचा परिणाम होतो.
मुंबई : पावसाळ्याच्या दिवसात वातावरणात झालेल्या बदलामुळे आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. परिणामी व्हायरल इंफेक्शन, सर्दी, खोकला, ताप अशा लहान सहान आजारपणं डोकं वर काढतात. पावसाळ्यात अस्वच्छता अधिक प्रमाणात वाढत असल्याने व्हायरल इंफेक्शन डोळ्यातही पसरू शकते.
व्हायरल आय इंफेक्शनची नेमकी लक्षणं कोणती ?
डोळ्यात टोचल्यासारखे वाटणं – डोळ्यात सतत काही खुपल्यासारखे वाटत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण हा त्रास खूप दिवस जाणवत असल्यास हे आय इंफेक्शनचे लक्षण आहे.
पापण्यांवर सूज जाणवणं – व्हायरल आय इंफेक्शनचे अजून एक लक्षण म्हणजे पापण्यांवरील सूज. डोळ्यांमध्ये सतत दाह जाणवत असल्यास परिणामी पापण्यांवर सूज येण्याचे प्रमाण वाढते. पापण्यांवरील सूज कमी करण्यासाठी कोल्ड कॉम्प्रेसचा वापर करा. पण एक दोन दिवसांमध्ये त्रास कमी न झाल्यास डॉक्टरांकडून योग्य निदान करा.
डोळ्यात खाज येणे – डोळ्याच्या व्हायरल इंफेक्शनचा त्रास होत असल्यास सतत डोळ्यात खाज येणं, जळजळ जाणवणं हा त्रास जाणवतो. यामुळे एका डोळ्यातून किंवा दोन्ही डोळ्यातूनही चिकट, पांढरा स्त्राव वाहतो. जळजळ जाणवण्यासोबतच ताप, स्कीन रॅश, थकवा जाणवत असल्यास फ्लूच्या त्रासाचे संकेत देतात.
कॉर्नियाजवळ ब्लड क्लॉट / रक्त साखळल्यासारखे वाटते – कॉर्नियाजवळ रक्त साकळल्याने तो भाग काळसर वाटतो. असे असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. या लक्षणाकडे दुर्लक्ष झाल्यास इन्फेक्शन डोळ्याभर पसरू शकते.
कोणती काळजी घ्याल ?
1. पावसाळ्याच्या दिवसात स्वच्छतेकडे जरूर लक्ष द्या. यामुळे इंफेक्शनचा धोका कमी होईल. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःच्या मनाने औषधं घेऊ नका.
2. आय इंफेक्शन असलेल्या व्यक्तीपासून दूर रहा. हे इंफेक्शन संसर्गजन्य असल्याने तुम्हांलाही त्याचा धोका वाढू शकतो.
3. नियमित हात साबणाने स्वच्छ करा. सतत डोळ्यांना हात लावणं, डोळे चोळणं टाळा.
4. तुम्हांला फ्लू किंवा आय इंफेक्शनचा त्रास होत असेल तर ते कमी करण्यासाठी मुबलक पाणी प्या. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते.