महिना 8 लाख पगार; काम - रोज 10 हजार पावलं चालणं! जाणून घ्या पात्रतेच्या अटी
This Company Is Hiring A Chief Steps Officer: या व्यक्तीला एकच काम असणार आहे आणि ते म्हणजे चालणं. या व्यक्तीने दिवसाला 10 हजार पावलं चालणं अपेक्षित असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. मात्र केवळ चालण्यासाठी पगार देण्यामागील उद्देश काय आहे तुम्हाला माहितीये का?
This Company Is Hiring A Chief Steps Officer: दिवसाला 10 हजार स्टेप्स चालण्याची सवय ही आरोग्यासाठी फायद्याची असते असं म्हटलं जातं. अनेक डॉक्टरांनी आणि आरोग्यासंदर्भातील संशोधनांमधून केवळ रोज चालण्याची सवय लावली तरी आपली प्रकृती निरोगी राहू शकते असं सिद्ध झालं आहे. हल्ली तर अनेक विमा कंपन्याही तंदरुस्त असलेल्या व्यक्तींकडून काही ठरावीक विमा पॉलिसींसाठी कमी प्रमाणात प्रमिअम घेतात. अनेक कंपन्याही आपल्या कर्मचाऱ्यांनी नियमीतपणे चालावं यासाठी छोट्यामोठ्या स्पर्धांचं आयोजन करत असतात. असाच पुढाकार ब्रिटनमधील एका कंपनीने घेतला आहे.
चीफ स्टेप ऑफिसरची नियुक्ती
युनायटेड किंग्डममधील 'जीमबर्ड' नावाची कंपनीने चीफ स्टेप ऑफिसरच्या (Chief Steps Officer) शोधात असल्याचं म्हटलं होतं. कंपनी पहिल्यांदाच या पदावर एखाद्या व्यक्तीची भरती करत असल्याचंही सांगण्यात आलेलं. या कंपनीच्या वेबसाईटवरील माहितीनुसार ही कंपनी रोज 10 हजार पावलं चालणाऱ्या व्यक्तीला तब्बल 10 हजार अमेरिकी डॉलर्स म्हणजेच 8 लाख रुपयांहून अधिक पगार देणार आहेत.
रेकॉर्ड कंपनी ठेवणार
सीएनबीसीने दिलेल्या वृत्तानुसार या चीफ स्टेप ऑफिसरने या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना चालण्यासंदर्भातील प्रेरणा देणं अपेक्षित आहे. म्हणजेच या कर्मचाऱ्यांना दिवसाला 10 हजार पावलं चालायची सवय लागत नाही तोपर्यंत त्यांना प्रेरित करण्याचं काम या व्यक्तीला करावा लागणार आहे. कंपनीकडून चीफ स्टेप ऑफिसर किती चालतो याचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी त्याला स्मार्टवॉच देणार असल्याचं सांगितलं आहे. सध्या एका महिन्यासाठी ही चीफ स्टेप ऑफिसरची नियुक्ती केली जाणार.
हे ही करावं लागणार
तसेच चीफ स्टेप ऑफिसर म्हणून आपला अनुभव आठवड्यातून एकदा सोशल मीडियावर शेअर करणंही अपेक्षित आहे. या पोस्टमुळे इतर लोकांनाही चालण्याची प्रेरणा मिळू शकते असं कंपनीचं म्हणणं आहे. वयाची 18 वर्ष अर्ज करणाऱ्या व्यक्तीने पूर्ण करणं अपेक्षित आहे. ही व्यक्ती अमेरिकन असावी किंवा कायमची अमेरिकेत निवासी असलेली असावी. प्रत्येक आठवड्याचे अनुभव या व्यक्तीने शेअर करणं अपेक्षित असून ते व्हिडीओ माध्यमातून असणही बंधनकारक आहे. दर आठवड्याला सोशल मीडियावर एक पोस्ट करणं बंधनकारक असणार आहे. इतरांना प्रेरणा देण्यासाठी सोशल मीडियावरील ही पोस्ट बंधनकारक असणार आहे. तसेच या नोकरीमुळे पैशांबरोबरच अर्ज केल्यानंतर निवडण्यात आलेला चीफ स्टेप ऑफिसर हा स्वत: फार तंदरुस्त राहील असंही कंपनीने म्हटलंय.
अधिक नोकऱ्या देण्याचा प्रयत्न
'जीमबर्ड'चे सहसंस्थापक अॅशले वॉल्टन यांनी भविष्यामध्ये आम्ही अशापद्धतीच्या अधिक नोकऱ्या दिर्घकालीन नोकरी उपलब्ध करुन देऊ असं म्हटलं आहे. लोकांनी हलचाल केली पाहिजे, त्यांनी व्यायाम केला पाहिजे यासाठी त्यांना प्रेरित करणं गरजेचं असल्याचं आरोग्यासंदर्भात काम करणाऱ्या या कंपनीचं म्हणणं आहे. ही नवीन पोस्ट निर्माण करुन केली जाणारी नियुक्ती त्याचा भाग असल्याचं सांगितलं जात आहे.