कोरोनाचा कर्दनकाळ येतोय; सर्व व्हेरियंटवर रामबाण लस
सर्व व्हेरियंटवर प्रभावी ठरेल अशी लस उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जातोय.
मुंबई : दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेला नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनने सर्व जगाची चिंता वाढवली आहे. आतापर्यंत 55पेक्षा अधिक देशांमध्ये या व्हेरिएंटचे रूग्ण पसरलेत. इतकंच नाही तर भारतातंही ओमयक्रॉनचे 87 रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या दोन्ही लसी घेतलेल्या व्यक्तींनाही ओमायक्रॉनची लागण होत असल्याचं दिसून आलं.
दरम्यान येत्या काळात कोरोनाचे आणखी काही व्हेरिएंट येऊ शकतात असं मानलं जातंय. भविष्यातील हा विचार कर सर्व व्हेरियंटवर प्रभावी ठरेल अशी लस उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जातोय.
अशा लसीची चाचणी सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे ही लस नीडल फ्री म्हणजे यामध्ये सुईचा वापर नसणार आहे. केंब्रिज विद्यापीठाचे प्राध्यापक आणि डिओसिनवॅक्सचे सीईओ जोनाथन हिनेय यांनी ही लस तयार केली आहे.
NIHR साऊदम्पटन क्लिनिकल रिसर्चमध्ये या चाचण्या करण्यात येणार आहेत. यामध्ये 18 ते 59 वयोगटातील व्यक्तींना सहभागी करण्यात येणार आहे. याबाबत जोनाथन होनेय यांनी सांगितलं की, “सध्या कोरोनाचे नवीन व्हेरियंट येत आहेत. यामुळे रोगप्रतिकारशक्ती देखील कमी होताना दिसतेय. अशावेळी नव्या टेक्नॉलॉजीचा वापर करायला हवा."
डिओज-कोवॅक्स (Dios-Covax) लसीमध्ये अशा नव्या टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. ही लस व्हेरियंट आणि कोरोना विरोधात अधिक सक्षम असेल, असा दावाही होनेय यांनी केला आहे.
कोरोनाच्या लसींवर आणि नव्या व्हेरियंटवर नव्या लस या आधुनिक टेक्नॉलॉजीवर तयार व्हायला पाहिजेत. त्यांची चाचणी करण्यासाठी काही लोकं तयार ठेवायला हवेत. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या नव्या विषाणूच्या धोक्यापासून आपलं संरक्षण करता येईल, असंही ते म्हणालेत.
"जागतिक कोरोना लसीच्या दिशेने हे पहिलं पाऊल आहे. ही लस केवळ कोरोना व्हेरियंट पासूनच आपलं रक्षण करणार नाही, तर यापुढे कोरोनाच्या व्हेरिएंटपासून रक्षण करणार आहे”, असाही दावा जोनाथन हिनेय यांनी केलाय.