Viral Video : चॉकलेट खाताय? सावधान! कॅडबरी डेअरी मिल्कमध्ये आढळली जिवंत अळी
Worm in Dairy Milk Chocolate : प्रसिद्ध कॅडबरी डेअरी मिल्क चॉकलेटमध्ये जिवंत अळी सापडल्याचा दावा एका व्यक्तीने केला आहे. यासंदर्भातील व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Worm in Dairy Milk Chocolate News in Marathi: चॉकलेटचं नुसतं नाव काढले तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चॉकलेट आवडते. म्हणूनच आपण अनेकदा सेलिब्रेट करण्यासाठी एकमेकांना चॉकलेट देतो. भारतीय कंपन्यांनी तयार केलेल्या चॉकलेट्ससोबतच विदेशी चॉकलेट्सही बाजारात सहज उपलब्ध होतात. त्यामुळे नातेवाईक आणि मित्रमंडळींना भेटवस्तू देण्यासाठी चॉकलेटची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. पण हेच चॉकलेट खाताना आता काळजी घ्या. कारण सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये प्रसिद्ध कंपनी कॅडबरी डेअरी मिल्कमध्ये जिवंत अळी सापडल्याचा दावा एका व्यक्तीने केला आहे.
एका ग्राहकाने प्रसिद्ध कॅडबरी डेअरी मिल चॉकलेटमध्ये चक्क अळी सापडल्याचा दाव केला आहे. याचा व्हिडिओ या व्यक्तीने एक्सवर (ट्विटर) पोस्ट केला असून काही युजर्सकडून कॅडबरीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
पोस्टमध्ये काय आहे?
रॉबिन झॅकियस नावाच्या एका व्यक्तीने पोस्ट शेअर केली आहे. हैदराबादच्या अमीरपेट येथील रत्नदीप मेट्रोमध्ये घडल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. “अमीनपेट येथील रत्नदीप मेट्रोमधून विकत घेतलेल्या कॅडबरी चॉकलेटमध्ये एक जिवंत अळी सापडली आहे. या अशा एक्स्पायरी डेट जवळ आलेल्या उत्पादनांची तपासणी करण्यासाठी कुठली यंत्रणा आहे का? सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीतल्या या अक्षम्य हलगर्जीरणासाठी कोण जबाबदार आहे?" असा प्रश्न रॉबिनच्या पोस्टमध्ये उपस्थित करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये खरेदीची बिले देखील पोस्ट करण्यात आली आहे. यामध्ये 9 फेब्रुवारीलाच मेट्रो स्टेशनवरील रत्नदीप रिटेल शॉपमधून 45 रुपयांची कॅडबरी खरेदी करताना दिसत आहे
कंपनीने काय म्हटले?
कंपनी म्हणाली, "नमस्कार. मेंडेल्स इंडिया फूड प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीचे कॅडबरी इंडिया लि.) उत्पादनाचे उच्च दर्जा राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. तुम्हाला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. तुमच्या तक्रारीचे निराकरण करा, कृपया तुमच्या तक्रारीच्या सूचना suggestions@mdlzindia.com कृपया तुमचे संपूर्ण नाव, पत्ता, फोन नंबर आणि खरेदीदाराच्या माहितीसह आम्हाला ईमेल पाठवा", अशी विनंती कंपनीकडून करण्यात आली आहे.