मुंबई : अभिनेता इरफान खान गेले काही दिवस एका दुर्मिळ आजाराशी झुंजत असल्याची माहिती त्याने ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. त्यानंतर त्याच्या आजाराबाबत अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र आता अखेर इरफानने या आजाराचा खुलासा केला आहे. 


कोणता आजार ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इरफान खान सध्या न्युरो एन्डोक्राईन ट्युमर या आजाराने ग्रस्त असल्याची माहिती त्याच्या अधिकृत ट्विटल हॅन्डलवर देण्यात आली आहे.  


 



न्युरो एन्डोक्राईन ट्युमर म्हणजे काय ? 


न्युरो एन्डोक्राईन  ट्युमर हा एक दुर्मिळ आजार आहे. हा शरीरातील कोणत्याही भागात होऊ शकतो. हार्मोन्स पेशींमध्ये बिघाड झाल्यानंतर, अचानक वाढ झाली की ट्युमर वाढतो.  


इरफानने केलेल्या ट्विटनुसार आजाराच्या नावामध्ये न्युरो या शब्दाचा समावेश आहे म्हणजे तो मेंदूंशी निगडीत असलाच पाहिजे असे होत नाही. 


डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, न्युरो एन्डोक्राईन  ट्युमर हा शरीरात स्वादूपिंड, फुफ्फस, अ‍ॅपेंडिक्स आणि आतड्यांमध्ये होऊ शकतो.  


ट्युमर म्हणजे कॅन्सर का ? 


ट्युमर हा शब्द अनेकदा सामान्य लोकांना भयावह वाटतो.  मात्र प्रत्येक ट्युमर हा कॅन्सर असेलच असे नाही. हा आजार तीन टप्प्यांमध्ये वाढातो. स्टेज 1  आणि स्टेज 2 मध्ये औषधोपचार होऊ शकतात. मात्र तिसर्‍या  टप्प्यावर आजार गेल्यास किंवा शरीरात तो इतरत्र पसरल्यास त्यावर केमोथेरपी किंवा शस्त्रक्रियेचा पर्याय उपलब्ध असतो.  


इरफानला त्रास कोणता ? 


इरफान  खानला झुंजत असलेला आजार नेमका कोणत्या टप्प्यावर आहे याची माहिती खुली करण्यात आलेली नाही. मात्र चाहत्यांंच्या प्रेमाने, इच्छाशक्तीने या आजारावर मात केली जाईल त्यासाठी प्रार्थना करण्याची मागणी इरफान खान आणि त्याच्या कुटुंबीयांनी केली आहे.