मुलांना स्मोकिंगची सवय लागू नये म्हणून पालकांनी काय करावं!
आजकाल तरूण पिढी देखील धुम्रपानाच्या विळख्यात ओढली जातेय.
मुंबई : धूम्रपान ही सवय आहे जी कोणत्याही वयोगटातील लोकांसाठी हानिकारक आहे. आजकाल तरूण पिढी देखील धुम्रपानाच्या विळख्यात ओढली जातेय. एकदा का धुम्रपानाची सवय लागली की ते एक व्यसन बनतं. मुलांना हे व्यसन लागू नये यासाठी पालकांनी लक्ष देणं फार गरजेचं आहे. अशावेळी पालकांनी काय केलं पाहिजे जाणून घेऊया...
मुलांशी चर्चा करा
आपल्या मुलांशी मैत्रीपूर्ण पद्धतीने धूम्रपान करण्यावर चर्चा करा. त्यांना धूम्रपानाबद्दल किती माहिती आहे ते विचारा आणि धूम्रपान करणं त्यांच्यासाठी हानिकारक आहे याची जाणीव करून द्या. काही पालक त्यांच्या स्वतःच्या प्रतिबंधांमुळे या विषयावर बोलण्यास दुर्लक्ष करतात, परंतु धूम्रपान करण्याबद्दल त्यांचा दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी नेहमीच निरोगी चर्चा करणं योग्य आहे.
आरोग्याविषयी समजवा
बऱ्याच मुलांना वाटतं की व्हॅपिंग (ई-सिगारेट) आणि इतर सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या पद्धती जसं, कँडी सिगारेट, वॉटर पाईप सुरक्षित आहेत. उलट त्यांना याबाबत जागरूक केलं पाहिजे. अशावेळी मुलांशी त्यामुळे होणाऱ्य़ा गंभीर आरोग्य समस्यांबद्दल बोला. तसंच पॅसिव्ह स्मोकिंगच्या हानिकारक परिणामांबद्दल त्यांना समजावून सांगा. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी लोकं सिगारेट ओढतात तिथे जाण्यावर बंदी घाला.
एक सिगारेट हानी पोहोचवू शकते
आपल्या मुलांना समजावून सांगा की एक सिगारेट देखील तुम्हाला धूम्रपानाचं व्यसन बनवू शकते. एकावेळी मजा करणं देखील सवय बनू शकते. त्यांना सांगा की धूम्रपान करणं आणि कालांतराने ते सोडणं एक कठीण काम आहे.