उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी अनेकजण मैदानावर खेळण्यास उतरतात. मात्र अशावेळी योग्य ती खबरदारी न घेतल्यास खेळांच्या दुखापतींना सामोरं जावं लागू शकतं. ज्यामुळे एखाद्याच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होतो. कोणताही खेळ खेळताना खेळाडू म्हणून प्रत्येकजण सर्वस्व पणाला लावून खेळत असतो. अशा वेळी त्याच्या शारीरिक क्षमतेचा कस लागतो. खेळताना या खेळाडूंना दुखापती होणंही साहजिक असतं. खेळांतून होणाऱ्या दुखापती पूर्णपणे टाळणं खेळाडूच्या हातात नसतं. पण, त्यांचं प्रमाण मात्र कमी करता येऊ शकतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या रूग्णालयातील ऑर्थोपेडिक्स आणि रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. प्रमोद भोर यांच्या सांगण्यानुसार, दररोज शाळा,कॉलेजमुळे अभ्यास, क्लासला जाणे यामुळे वेळ मिळत नसल्याचे उन्हाळी सुट्टीत खेळण्याचा मनसोक्त आनंद लूटणारी मुलं आणि दुसरीकडे ऑफीसच्या व्यस्त वेळापत्राकामुळे वेळ न मिळाल्याने केवळ सुट्टीच्या दिवशी मैदानावर उतरणाऱ्या प्रौढांना खेळाच्या दुखापतीचा धोका असतो. अशा वेळी  फिटनेस लेव्हल कमी असल्याने दुखापतींचा धोका अधिक असतो. त्यामुळे त्यांना होणाऱ्या दुखापती अधिक गंभीर असतात. हे लोक खेळायला सुरुवात करण्यापूर्वी चांगल्या प्रकारे वॉर्म अप करत नाहीत, स्ट्रेचिंग करत नाहीत. तसेच शारीरीक लवचिकता कमी असते यामुळे देखील दुखापती होऊ शकतात.


या 'फॉर्म्युल्या'चा करा वापर


दुखापतींमध्ये काही वेळा खेळताना खेळाच्या नादात अचानक संपूर्ण शरीर वाकतं. त्यामुळे स्नायूंवर ताण येऊन ते फाटू शकतात. दुखापतीतून बरं व्हायला राईस (RICE) हा फॉर्म्युला अवलंबायला विसरु नका. आर म्हणजे रेस्ट (विश्रांती), आय म्हणजे आइस म्हणजे बर्फ (दुखापत झालेल्या ठिकाणी बर्फ लावावा), सी म्हणजे कम्प्रेशन (दुखापत झालेला भाग गुलाबी रंगाच्या बँडेजने गुंडाळावा) आणि ई म्हणजे एलिव्हेशन (सुजलेला भाग वर ठेवला तर त्यामुळे सूज उतरायला मदत होते).


दुखापती कोणत्या होऊ शकतात?


एसीएल (ACL) - गुडघ्याला दुखापत झाल्यानंतर जर अँटीरियर क्रूसीएट लिगामेंट इजा (एसीएल) झाली असेल तर रुग्णाला वेदना, दुखापतीनंतर लगेच सूज येणे, वजन सहन न होणे आणि सांधे कडक होणे. मेनिसकल इजा झाल्यास, दुखापतीनंतर काही काळानंतर दिसणारी सूज वगळता सर्व लक्षणे सारखीच असतात


खांद्याची दुखापत - जर रोटेटर कफला दुखापत झाली असेल तर रुग्णाला सहसा वेदना, सूज आणि हात उचलता येत नाही. खांदे निखळल्यास वरील लक्षणांसह, स्नायुचे वळण आणि बाह्य रोटेशन (अंटीरियर डिसलोकेशन) मध्ये विकृती निर्माण होऊ शकते.


काय काळजी घ्याल?


  • क्रीडा व्यक्ती, क्रीडापटू आणि क्रीडा क्रियाकलापांमध्ये गुंतलेल्या व्यक्ती - तज्ञ, फिजिओथेरपिस्ट किंवा प्रशिक्षित व्यक्तींच्या योग्य मार्गदर्शनाखाली सराव करा.

  • उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे डिहायड्रेशन रोखण्यासाठी पुरेसे पाणी प्या

  • पोषक आहाराचे सेवन करा

  • स्नायू बळकट करण्यासाठी योग्य प्रशिक्षण घ्या

  • वॉर्म-अप करायला विसरु नका. व्यायामापूर्वी स्ट्रेचिंग करा आणि त्यानंतर वॉर्म-डाउन करा आणि व्यायामानंतरही स्ट्रेचिंग करा