कोरोनानंतर आता `हा` विषाणूच ठरेल जागतिक महामारीचे कारण? WHO ने दिली `ही` माहिती
Monkeypox virus | जगभरात मंकीपॉक्स आजारात सातत्याने वाढ होत आहे. हा आजार हे पुढील महामारीचे कारण बनू शकतो. याबाबत डब्ल्यूएचओने मोठी माहिती दिली आहे.
मुंबई : Monkeypox virus | कोरोना व्हायरसनंतर आता जगभरात मंकीपॉक्स विषाणूच्या वाढत्या रुग्णांमुळे लोकांची चिंता वाढली आहे. आतापर्यंत 24 देशांमध्ये या विषाणूची 435 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. मंकीपॉक्सकडे पाहता, पुढील जागतिक महामारीचे कारण बनू शकते अशी भीती वाटते. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे की मंकीपॉक्समुळे जागतिक महामारी होऊ शकते हे सांगणे सध्या खूप घाईचे ठरेल.
संसर्गाचा धोका कमी
डब्ल्यूएचओच्या मते, आफ्रिकेबाहेरील महामारी नसलेल्या देशांमध्ये वाढलेल्या प्रकरणांशी संबंधित बरीच माहिती अद्याप निश्चित केलेली नाही. अहवालात असे म्हटले आहे की या विषाणूला कोविड 19 सारखे समजू नये. याविषाणूपासून सर्वसमान्य जनतेला जास्त धोका नाही.
मंकीपॉक्स हा कोरोनापेक्षा वेगळा
डब्ल्यूएचओचे संचालक सिल्वी ब्रायंड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "हा विषाणू कोविड 19 सारखा आहे असं लोकांनी समजू नये. तसेच या संसर्गाला लोकांनी घाबरून जाऊ नये. मंकीपॉक्स हा कोरोनासारखा नसून तो वेगळा विषाणू आहे".
जागतिक महामारीबद्दल कमी चिंता
या विषाणूच्या अनुवांशिक स्वरूपाबद्दल आरोग्य तज्ञांकडे खात्रीलायक माहिती नाही. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, कोविड 19 आणि RNA-व्हायरस सारख्या इतर विषाणूंप्रमाणे मंकीपॉक्सचा विषाणू सहजपणे पसरत नाही.
मंकीपॉक्सबाबत डब्ल्यूएचओचे अधिकारी रोसामुंड लुईस म्हणाले की, या क्षणी आम्हाला जागतिक महामारीची चिंता नाही. मात्र, वाढते केसेस त्यांच्या चिंतेचे कारण असल्याचे त्यांनी मान्य केले.
समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन
हा विषाणू प्रथमच समलिंगी पुरुषांमध्ये दिसून आला आहे. या विषाणूची व्याख्या लैंगिक संक्रमित रोग म्हणून केलेली नाही.
लुईस यांनी समलिंगी संबंध ठेवणाऱ्या पुरुषांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.