संधीवाताचा त्रास होत असल्यास `हे` वाचाच...
आर्थराइटिस हा क्रोनिक इंफ्लेमेट्री डिसऑर्डर आहे
मुंबई : संधीवात (आर्थराइटिस) हा क्रोनिक इंफ्लेमेट्री डिसऑर्डर (जुनाट आजार) आहे जो सांध्यांना प्रभावित करतो. हा एक ऑटोइम्यून आजार आहे. जो आपल्या रोगप्रतिकार शक्तीवर चुकीच्या पद्धतीने हल्ला करतो. सर्वसाधारणपणे ४५ वर्षांहून अधिक वय असणाऱ्यांमध्ये आर्थराइटिस होण्याची शक्यता असते. ओस्टिओ आर्थराइटिस, रह्युमेटोइड आर्थराइटिस असे काही आर्थराइटिसचे प्रकार असतात.
आर्थराइटिस बरा होणं हे त्याच्या प्रकारावर, तीव्रतेवर आधारित असतं. हा आजार काही महिन्यांपासून ते अनेक वर्षांपर्यंतही राहू शकतो. आर्थराइटिसवर कोणताही पूर्ण उपचार नसल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. उपलब्ध असणारी औषधं रुग्णाची समस्या अधिक पुढे वाढू न देण्याचं आणि सांधेदुखीची तीव्रता कमी करण्याचं काम करतात.
यावर ठोस उपाय नसल्याने, आर्थराइटिसमुळे होणाऱ्या वेदनांपासून काही प्रमाणात आराम मिळण्यासाठी काही गोष्टी दररोजच्या जीवनात सामिल करुन अतिशय आवश्यक आहे.
दररोज व्यायाम करणं -
दररोज व्यायाम केल्याने संधीवातामुळे जखडलेले स्नायू हलके होण्याची शक्यता असते. प्रत्येक रुग्णासाठी व्यायामाचे प्रकार आणि त्याचा वेळ वेगवेगळा असू शकतो. सर्वसाधारणपणे अशा सर्व रुग्णांसाठी कमीत कमी २० मिनिटे व्यायामाची गरज असते. फिजिओथेरपीही करता येऊ शकते.
हेल्दी डाएट -
अशा रुग्णांनी आहारात ताजी फळं आणि भाज्यांचा समावेश करावा. मासे आणि ब्लॅक कॉफी यांसारख्या पदार्थांमध्ये अॅन्टीऑक्सिडेंट असतात जे संधीवाताच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरु शकतात. ग्रील्ड, फ्राइड, बारबीक्यू केलेले मांस खाणं टाळावं. या पदार्थांमुळे रुग्णाच्या सांध्यांची सूज वाढून वेदनाही वाढण्याची शक्यता असते.
धुम्रपान - मद्यपान टाळावे -
धुम्रपान, मद्यपानामुळे आर्थराइटिसची समस्या अधिक वाढण्याची शक्यता असते. संधीवाताच्या काही औषधांमध्ये अल्कोहलच्या संपर्कात आल्याने शरीरात इतर समस्या निर्माण होण्याची होऊ शकतात. त्यामुळे याचे सेवन टाळावे.
पुरेसा आराम -
अधिक वेदना जाणवू नये यासाठी संधीवाताच्या रुग्णांनी पुरेसा आराम करणंही आवश्यक आहे. परंतु आराम करत असतानाही त्यांनी सांध्यांची हालचाल करणं गरजेचं आहे.