मुंबई :  World Asthma Day 2021: दमा (Asthma) आणि कोविड-19ची (covid-19) लक्षणांत समानता असल्याने वेळीच चाचणी आवश्यक आहे. त्यामुळे दम्याच्या रुग्णांनी (Asthma patients) कोविड काळात विशेष काळजी घेणे आवश्यक, असे डॉक्टरांनी आपले मत व्यक्त केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोविड-19च्या पहिल्या टप्प्यातील कोरोनाच्या लक्षणांमध्ये ताप, सर्दी, खोकला, घशा खवखवणे ही लक्षणे प्रामुख्याने दिसून येत होती. पण आता पाठदुखी, डोकेदुखी, उलट्या होणे, दम लागणे, घशात खवखव आणि सर्दी होणे अशी अनेक लक्षणे कोविड-19च्या दुसऱ्या लाटेमध्ये दिसू लागली आहेत. त्यामुळे इतर दम्याचे जे आजार आहेत, त्यामध्येही अशी काही लक्षणे दिसून येत असल्याने लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ लागला असल्याने दम्याच्या रूग्णांनी या काळात विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचा सल्ला डॉक्टरांनी 'जागतिक अस्थमा' दिनानिमित्त (World Asthma Day) दिला आहे.  


'कोरोना काळात विशेष काळजी घ्या'


कोरोना आणि दमा पहिल्यांदा फुफ्फुसावर आघात करतो, हे सत्य आहे. साधारणतः पावसाळ्यात सुरूवातीला ढगाळ वातावरण आणि दमट हवामानामुळे हवा अशुद्ध असल्याने दम्यांचे विकार अनेकांमध्ये दिसून येतात. त्यातच दम्याचा विकार असणाऱ्यांना या कालावधीत अधिक त्रास जाणवतो. अशावेळी श्वसननलिकेला आतमध्ये सूज येते आणि ती आकुंचन पावते. परंतु, योग्य उपचार झाल्यास श्वसननलिका पुन्हा पुर्वस्थितीत येऊ शकते. याशिवाय कोरोना संसर्ग झाल्याचे वेळीच निदान व उपचार न झाल्यास विविध आजार होण्याची शक्यता अधिकच बळावते. त्यातच मधुमेह नियंत्रणात न राहिल्यास त्याचा फुप्फुसाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. फुफ्फुसाचे कार्य बिघडल्यास श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळेच दम्याचा विकार असणाऱ्यांना या कोरोना काळात आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचं आहे, असे अपोलो क्लिनिक पुणे चे डॉ. विशाल रमेश मोरे म्हणाले.  


डॉ. मोरे पुढे म्हणाले की, दमा आणि कोरोना या दोन्ही आजारांची लक्षणे सारखीच आहेत. दम्याच्या आजारावर योग्यपद्धतीने उपचार सुरू असतील तर तुम्हाला कोरोना होण्याची शक्यता फार कमी असते. परंतु, काळजी न घेतल्यास या दम्याच्या रूग्णांना कोरोना संसर्गाचा धोका हा इतरांमध्ये जास्त असतो. फुफ्फुसात संसर्ग झाल्यास तापही येऊ शकतो. म्हणून कोणतीही लक्षणे दिसल्यास दम्याच्या रूग्णांनी तातडीने डॉक्टरांकडून तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. 


दम्याच्या रुग्णांनी लसीकरण करुन घ्यावे


न्यूमोनिया झालेला असल्यास कोविड-19 ची चाचणी करून घ्यावी. नेहमीच्या औषधांनीही दम्याचा त्रास कमी होत नसेल तर तो कोविड-19 असू शकतो. त्यामुळे अशा रूग्णांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावेत, बॅकेच कामाला असल्यास एन ९५ मास्कचा वापर करा, दम्याच्या रुग्णांनी लसीकरण करुन घ्यावे, ही अतिशय फायदेशीर ठरु शकते. बाहेरून घरात आल्यावर आंघोळ करावी आणि कपडे धुवायला टाकावेत. घरात ज्या ठिकाणी तुम्ही स्पर्श केलाय ती जागा सॅनिटाईज करून घ्यावी. दम्याची औषध योग्यपद्धतीने घेणेही गरजेचं आहे. जर तरीही कुठलीही लक्षणे आढळून आल्यास आपल्या छातीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. यामुळे दम्याच्या रूग्णांना कोरोना संसर्गाचा धोका कमी होतो आणि त्यांचा दमाही नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 


घरच्या घरी व्यायाम करण्याचा प्रयत्न करा


पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा जनरल फिजिशीयन डॉ. संजय नगरकर म्हणाले की,  दम्याच्या रूग्णांकडून आम्हाला अनेक कॉल्स येतात ज्यामध्ये रुग्णांना कोविड-19 सारखीच लक्षणे दिसून येतात.  हे रुग्ण मानसिक आणि भावनिकदृष्ट्या खचून जात असल्याने त्यांनी पुरेशी विश्रांती घेणे, ध्यान-धारणा करणे आवश्यक आहे.  दम्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. म्हणून जर जवळील व्यक्तीला दम्याचा त्रास असेल तर त्या व्यक्तीची लक्षणे, त्यांना होणारा त्रास याची वेळोवळी नोंद ठेवा. त्यांना लागणाऱ्या औषधांची यादी देखील नियमितपणे सोबत ठेवा. तपासणीकरिता जाताना देखील या व्यक्तींच्या सोबत रहा. घरच्या घरी व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. परिस्थिती नियंत्रणात नाही असे वाटल्यास डॉक्टरांना फोन करा.