डोहाळे नक्की आईचे की बाळाचे? गरोदरपणात डोहाळ्याच्या नावाखाली चुकीचा आहार तर घेत नाही ना?
Dohale During Pregnancy : गरोदरपणात प्रत्येक स्त्री डोहाळेच्या अनुभवातून जात असते. खऱ्या अर्थाने डोहाळे म्हणजे काय? आणि या डोहाळ्यांचा गर्भावर म्हणजे बाळावर काय परिणाम होतो? डोहाळे पुरवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबाबत योगगुरु सायली वैद्य यांनी सांगितल्या खास टिप्स.
आईपण हे प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा आहे. गरोदरपणातील प्रत्येक स्त्रीचा अनुभव हा वेगळा असतो. घरात एखादी स्त्री गरोदर असली की, संपूर्ण घराचं वातावरण बदलून जातं. या दिवसांमध्ये त्या गरोदर स्त्रीची विशेष काळजी घेतली जाते? घरातील वातावरण अतिशय प्रसन्न असतं. तसेच त्या स्त्रीला काय हवं नको ते पाहिलं जातं. या दिवसांमध्ये गर्भवती स्त्रीला डोहाळे लागतात. पण डोहाळे म्हणजे काय? हे समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. तसेच या डोहाळ्यांचा गर्भातील बाळावर काय परिणाम होतो?
डोहाळे म्हणजे काय?
डोहाळे म्हणजे गर्भवती महिलांना गरोदरपणात अनेक पदार्थ खाण्याची इच्छा होते. यामध्ये आंबट, चटपटीत तसेच काहींना ठराविक पदार्थ खावेसे वाटतात. तसेच काही महिला माती, खडू देखील या दिवसांमध्ये खातात. डोहाळ्यामध्ये गरोदर महिलांची वेगवेगळे पदार्थ खाण्याची इच्छा होते.
योगा एक्सपर्टचे मत
डोहाळे का लागतात?
गरोदरपणात स्त्रियांच्या हार्मोन्समध्ये बदल होत असतो. शरीरातील या हार्मोनल बदलामुळे स्त्रियांना डोहाळे लागतात. त्यातच शरीरात एखादा विशिष्ट पोषकद्रव्य कमी झाल्यासदेखील स्त्रियांना ते पदार्थ खावेसे वाटतात. स्त्रियांना माती किंवा खडू खावासा वाटात असेल तर, त्या स्त्रीमध्ये कॅल्शिअमची कमतरता आहे असं दिसून येतं. तसेच या दिवसांमध्ये आंबट पदार्थ देखील खाल्ले जातात.
डोहाळे आईचे की बाळाचे?
डोहाळे हे खऱ्या अर्थाने त्या आईचे असतात. या दिवसांमध्ये आईला वेगवेगळे पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होते. अनेक महिलांना हे पदार्थ खाल्ल्याशिवाय चैन मिळत नाही. अगदी या दिवसांमध्ये डोहाळे पुरविले गेले नाही तर त्यांच्या शरीरावरही त्याचा परिणाम होतो. पण हे सगळं करताना गर्भवती आईने विशेष काळजी घ्यायला हवी, असं योगगुरु सायली वैद्य यांनी सांगितलं आहे.
गर्भसंस्कार बाळावर नाही तर आईवर
गरोदरपणात केले जाणार गर्भसंस्कार हे बाळावर नाही तर आईवर होत असतात. या दिवसांमध्ये आईवर चांगले संस्कार घडतात. आहार उत्तम सुधारला जातो. तसेच या दिवसांमध्ये गर्भवती स्त्री चांगलं खाते, चांगलं ऐकते आणि चांगलं वाचते. तसेच चांगला विचार करते. त्यामुळे या दिवसांमध्ये गर्भावर तर परिणाम होतोच पण आईवर देखील होतो. गरोदरपणात जर तुम्ही चांगला आहार घेतला तर गर्भातील बाळाला देखील चांगल खाण्याची सवय लागते. गरोदरपणातच जंक फूड खाणे टाळले तर बाळाला ही चव कधीच आवडत नाही. त्यामुळे गरोदरपणात गर्भसंस्कार करताना याचा फायदा होतो.