तुम्हाला रात्री झोप येत नाहीये...मग हे उपाय नक्की करून पहा
आजकाल मोठ्या प्रमाणात दिसून येणारी समस्या म्हणजे निदानाश.
मुंबई : सध्या काम आणि धावपळीच्या जीवनात व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. यामध्ये आजकाल मोठ्या प्रमाणात दिसून येणारी समस्या म्हणजे निदानाश. अनेकदा चिंता, मानसिक तणावाचा आपल्या झोपेवर परिणाम होत असतो. दिवसभराच्या धावपळीनंतर आपल्याला रात्री नियमित सात-आठ तासांची झोप घेणं निरोगी आरोग्यासाठी आवश्यक आहे.
कोणत्या वयोगटातील व्यक्तींसाठी किती तासांची झोप पुरेशी?
6 ते 9 वयोगटातील मुलांसाठी 9 ते 11 तासांचा झोप आवश्यक आहे.
12 ते 16 वयोगटातील मुलांसाठी 8 ते 10 तासांची झोप आवश्यक आहे.
18 ते 64 वयोगटातील व्यक्तींसाठी 7 ते 9 तास झोप गरजेची आहे.
65 वर्षांवरील वृद्धांसाठी 7 ते 8 तास झोप गरजेची आहे.
इन्सोम्निया म्हणजेच निद्रानाशाचा त्रास टाळण्यासाठी या गोष्टींचं पालन करा
चहा आणि कॉफीचं सेवन टाळावं
चहा आणि कॉफी या पेयांमध्ये आढळणाऱ्या कॅफिन या उत्तेजक घटकामुळे तुमची झोप उडते. त्याचप्रमाणे कॅफिनच्या सेवनाने रात्री वारंवार लघवी येऊ शकते. परिणामी तुमची झोपमोड होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी चार ते सहा तास अगोदर चहा किंवा कॉफी सेवन करू नये.
रात्री भरपूर खाऊ नका
रात्रीच्या मानाने तुम्हाला हवं ते दिवसा खाणं टाळा. रात्री हलका आहार घ्या आणि तिखट तसंच मसालेदार पदार्थ देखील टाळा. कारण पित्त आणि अपचनाचा त्रास झाल्यास तुमची झोप बिघडू शकते.
झोपण्यापूर्वी व्यायाम टाळा
काही लोकं सकाळी व्यायाम करण्याऐवजी संध्याकाळी उशीरा व्यायाम करतात. यामुळे निद्रानाशाचा त्रास अधिक शक्यता आहे. व्यायाम सकाळीच करणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण तुम्हाला संध्याकाळी व्यायाम करायचा असल्यास तो झोपण्यापूर्वी किमान चार तासआधी करावा.
दिवसा झोपू नका
दुपारच्या जेवणानंतर तुम्ही काही काळ झोप घेत असाल तर ही सवय लगेच मोडून टाका. तुम्हाला दिवसभर प्रसन्न ठेवण्यास दुपारच्या झोपेची मदत होत असेल पण या सवयीमुळे तुमची रात्रीच्या झोपेचं चक्र मात्र बिघडतंय. आणि याचा थेट परिणाम तुमच्या दुसऱ्या दिवसावर होतो.