तुम्ही वापरत असलेल्या शॅम्पूमुळे कॅन्सरचा धोका? एफडीएची शॅम्पू उत्पादक कंपन्यांना नोटीस
एफडीएनं नोटीस बजावल्यानंतर युनिलिव्हर कंपनीने डव, ट्रेसमेसहीत अनेक प्रसिद्ध ब्रँडसचे ड्राय शॅम्पू बाजारातून परत मागवले आहेत.
मुंबई : तुमचे केस सिल्की आणि शायनी व्हावेत तसंच केस गळू नये यासाठी सगळेच जण केसांची काळजी घेताना दिसतात. त्यामुळे बाजारात वेगवेगळ्या ब्रँड्सच्या शॅम्पूची चांगलीच चलती आहे. मात्र हेच शॅम्पू केसानं तुमचा गळाही कापू शकतात. कारण ड्राय शॅम्पूमुळे ब्लड कॅन्सर होण्याचा धोका असण्याची शक्यता आहे. दरम्यान याप्रकरणी आता अमेरिकच्या एफडीएनं नोटीस बजावल्यानंतर युनिलिव्हर कंपनीने डव, ट्रेसमेसहीत अनेक प्रसिद्ध ब्रँडसचे ड्राय शॅम्पू बाजारातून परत मागवले आहेत.
कंपनीच्या ड्राय शॅम्पूमध्ये बेंजिन नावाचं एक धोकादायक रासायनिक द्रव्य आढळलं आहे, ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका वर्तवण्यात आलाय. अमेरिकेत ही कारवाई करण्यात आलीये.
अमेरिकन एफडीनं तिथल्या काही शॅम्पू उत्पादक कंपन्यांना नोटीस बजावलीये. त्यानंतर डव, ट्रेसमे, नेक्सस, सुवे, टिगी अशा ब्रँड्सचे शॅम्पू परत मागवण्यात आलेत. परत मागवण्यात आलेल्या शॅम्पू उत्पादनांची निर्मिती 2021 मध्ये झालीये. याशिवाय जॉन्सन अँड जॉन्सचं न्यूट्रोगेना, ऍड्जवेल पर्सनल केअर कंपनीचं बनाना बोट आणि बियर्सडॉर्फ एजीचं कॉपरटोन अशी 18 महिन्यातील उप्तादनंही परत मागवण्यात आलीयेत.
जरी ही कारवाई अमेरिकेत झाली असली तरी भारतातही शॅम्पूची मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे भारतीयांनी शॅम्पूच्या बाबतीत वेळीच सावध व्हायला हवं.