नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या काळात सोन्या-चांदीची झळाळी सतत वाढतेच आहे. सोन्याच्या दरात मोठी उसळी आली असून 24 कॅरेट गोल्डच्या भावात ऐतिहासिक वाढ झाली आहे. सोन्याचा आजचा दर हा 53000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदीचा आजचा दर 65000 रुपये प्रति किलो आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहेत सोन्या-चांदीचे दर वाढण्यामागची संभाव्य कारणं -


- कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रकोपामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचं सावट आहे. यामुळे, गुंतवणूकदारांचा कल सॉफ्ट एसेट्स अर्थात शेअर, बॉड्सऐवजी, हार्ड एसेट्स म्हणजेच सोने, चांदी, रिअल इस्टेट, क्रूड ऑइल इत्यादीकडे अधिक आहे. यापैकी गुंतवणूकदारांची पहिली पसंती सोने-चांदीला आहे.


- कोरोना काळात आर्थिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी, जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक पॅकेजमुळे सोन्या-चांदीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. कारण आर्थिक पॅकेजमुळे महागाई वाढण्याची शक्यता असू शकते आणि त्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूकीकडे वळतो. 


- केंद्रीय बँकांनी व्याजदरात केलेल्या कपातीमुळे गुंतवणूकदार सराफा बाजाराकडे वळले आहेत. कारण त्यांना त्यात अधिक रिटर्न्स मिळणं अपेक्षित आहे.


- कोरोना काळातही आतापर्यंत, सोन्या-चांदीमधून गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स मिळाले आहेत. भारतात 16 मार्चनंतर सोन्याच्या दरात 32 टक्क्यांनी तर 18 मार्चनंतर चांदीच्या दरात 86 टक्क्यांनी वाढ झाली आहे.


- तणावाच्या परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहतात. सध्याच्या अमेरिका आणि चीनमधील वाढत्या तणावामुळे सराफा बाजाराला पाठिंबा मिळत आहे.


- मौल्यवान धातूंच्या वाढीमागील प्रमुख कारण म्हणजे डॉलरची कमजोरी. जगातील 6 प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरची मजबुती दर्शविणारा, डॉलर इंडेक्स अजूनही कमकुवत आहे, ज्यामुळे सोन्या-चांदीसाठी गुंतवणूकदारांची मागणी वाढली आहे. 18 मे रोजी डॉलर इंडेक्स 100.43 वर होता, तो आता 94.87वर कोसळला आहे.


- कोरोनामुळे शेअर बाजारात आलेल्या अनिश्चिततेच्या वातावरणामुळे सोन्या-चांदीचे भाव वाढत आहेत.


- मेक्सिकोमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने, चांदीचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे चांदीचे दर लक्षणीय वाढले आहेत.


- चांदीची औद्योगिक मागणी (Industrial demand) वाढण्याची शक्यता असल्याने, गुंतवणूकदारांचा चांदीकडे अधिक कल आहे. कारण चांदी हा एक औद्योगिक धातू आहे आणि जगभरात लॉकडाऊन उघडल्यानंतर यासाठीची औद्योगिक मागणी वाढण्याची शक्यता आहे.