ट्रॅफिकचे कडक नियम, दंडापासून वाचा १०० रुपयांमध्ये
ट्रॅफिकच्या नव्या कडक नियमांमुळे गाडी चालवणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
मुंबई : ट्रॅफिकच्या नव्या कडक नियमांमुळे गाडी चालवणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. गाडी घेऊन घरातून बाहेर पडल्यानंतर ट्रॅफिक पोलिसाने अडवल आणि तुमच्याकडे आवश्यक कागदपत्र नसतील तर घाबरायची गरज नाही. यासाठी तुम्हाला आवश्यक दंड भरावा लागेल, पण या दंडातले १०० रुपये कापून बाकीचे पैसे तुम्हाला परत मिळू शकतात.
तुमच्याजवळ लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (आरसी), इन्श्यूरन्स आणि पीयूसी आहे, पण घरातून बाहेर पडताना तुम्ही ही कागदपत्रं विसरलात आणि ट्रॅफिक पोलिसाने अडवलं तर तुम्हाला चलन फाडावं लागणार आहे. चलन फाडताना तुमच्याकडून मोठ्या प्रमाणात दंड घेतला जाईल.
दंडाची ही रक्कम दिल्यानंतर १५ दिवसात तुम्हाला ट्रॅफिक पोलिसांच्या ऑफिसमध्ये जाऊन तुमची कागदपत्र दाखवावी लागतील. जर तुमची सगळी कागदपत्र योग्य असतील तर ट्रॅफिक पोलीस अधिकारी तुमचं चलन रद्द करेल आणि तुमची दंडाची रक्कम तुम्हाला परत देईल, पण तुम्हाला गाडीसोबत कागदपत्र न ठेवल्यामुळे १०० रुपये दंड भरावा लागेल.
चलन रद्द करण्यासाठी आणि दंडाची रक्कम परत घेण्यासाठी तुमच्याकडची कागदपत्र वैध असणं गरजेचं आहे. ज्या दिवशी दंड आकारला गेला त्या तारखेला तुमच्या कागदपत्रांची वैधता संपलेली असेल, तर मात्र हे चलन रद्द होणार नाही आणि दंडाची रक्कमही परत मिळणार नाही.