मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीबाबत  Employees Provident Fund (EPF) नवी धक्कादायक माहिती हाती आली आहे. या निधीत जमा झालेली रक्कम पाहिली तर आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही नोकरी करत असाल तर निवृत्तीपर्यंत तुमच्या खात्यात काही लाख रुपये जमा होतील. पण एका व्यक्तीच्या खात्यात किती रक्कम जमा आहे माहित आहे? चक्क 102 कोटी रुपये. हा अब्जाधीश कर्मचारी कोण, याचा खुलासा होऊ शकलेला नाही. (102 crore in PF account of this person, Rs 62,500 crore deposited in 1.23 lakh account)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर 86 कोटी रुपये, तर तिसऱ्या क्रमांकावर 85 कोटी रुपये जमा असलेले आणखी दोघेजण आहेत. त्यांच्यासारख्या टॉप 20 जास्त पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या खात्यावर तब्बल 825 कोटी रुपये जमा आहेत. तर जादा पगार असलेल्या 1 लाख 23 हजार लोकांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात तब्बल 62,500 कोटी रुपये एवढी रक्कम जमा आहे.


ईपीएफ खात्यात जमा होणाऱ्या रकमेवर सरकार आयकरात सूट देतेच. शिवाय 8 टक्के एवढा निश्चित व्याज परतावा मिळतो. त्यामुळंच ईपीएफ खात्यात जास्तीत जास्त रक्कम जमा करण्याकडे उच्च उत्पन्न नोकरदारांचा कल दिसतो. त्यामुळंच यंदाच्या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नवा बदल केलाय.. त्यानुसार पीएफ खात्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त योगदान असल्यास त्याला व्याजावर कर सवलत मिळणार नाही, असा नियम करण्यात आला आहे.


सरकारने बनवलेल्या नियमांचा वापर करून काही जण कसे गब्बर झालेत, हे या ईपीएफ प्रकरणामुळं समोर आले आहे. नव्या सुधारणांमुळे पीएफमध्ये जास्तीत जास्त रक्कम गुंतवण्याचा ट्रेंड कमी होईल, अशी अपेक्षा आहे.