मेघालयात निवडणुकीपूर्वी काँग्रेसला झटका, ११५ सदस्यांचा राजीनामा
निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला एक मोठा झटका बसला आहे.
नवी दिल्ली : निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला एक मोठा झटका बसला आहे.
निवडणूक आयोगाने मेघालय, नागालॅंड आणि त्रिपुरा राज्यात होणाऱ्या निवडणुकांचा कार्यक्रम काही दिवसांपूर्वीच जाहीर केला. यानंतर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
काँग्रेस सदस्यांचा राजीनामा
मात्र, मेघालयात काँग्रेससाठी एक झटका बसला आहे. कारण, तिकीट वाटपावरुन मेघालयातील ११५ काँग्रेस सदस्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
दोन विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस सदस्य नाराज
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण गारो हिल्स जिल्ह्यात चोकपोट विधानसभा क्षेत्रात जवळपास १०० सदस्यांनी लाजारुस संगमा यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. तर, भोई जिल्ह्यात जिरांग विधानसभा क्षेत्रात तिकीट वाटपावरुन नाराज झालेल्या १५ सदस्यांनी राजीनामा दिला आहे.
२७ फेब्रुवारीला मेघालयात निवडणुका
मेघालयात २७ फेब्रुवारी रोजी निवडणुका होणार आहेत आणि मतमोजणी तीन मार्च रोजी होणार आहेत. ६० सदस्यांच्या मेघालय विधानसभेचा कार्यकाळ सहा मार्च रोजी संपत आहे.
मेघालयमध्ये काँग्रेस पक्षाच्या प्रचाराची सुरुवात मंगळवारी पक्षाध्यक्ष राहुल गांधी करतील. या दरम्यान राहुल गांधी पक्षातील नेते आणि इतर संघटना, संस्थांच्या अध्यक्षांसोबत चर्चा करतील.