नवी दिल्ली: भारतीय पोलीस सेवेच्या (आयपीएस) २०१६ च्या बॅचमधील बहुतांश अधिकारी पोलीस अकादमीच्या परीक्षेत नापास झाल्याची बाब समोर आली आहे. पोलीस अकादमीची पदवी मिळवण्यासाठी ही परीक्षा देणे अनिवार्य असते. मात्र, २०१६ च्या बॅचमधील १२२ पैकी ११९ अधिकारी या परीक्षेत नापास झाले होते. यानंतरही या सर्व अधिकाऱ्यांना त्यांच्या केडरमध्ये प्रोबेशनवर पाठवण्यात आले होते. परंतु, या अधिकाऱ्यांनी ही परीक्षा पास करणे अनिवार्य आहे. एखादा आयपीएस अधिकारी जास्तीत जास्त तीनवेळा या परीक्षेला बसू शकतो. या तिन्ही प्रयत्नात अपयशी ठरल्यास संबंधित अधिकाऱ्याला आयपीएस सेवेत राहता येत नाही. 


मसूरीच्या लालबहादूर शास्त्री प्रशिक्षण अकादमीत आयएसएस तर हैदराबादच्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय अकादमीत आयपीएस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. टाईम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, २०१६ च्या बॅचमध्ये एकूण १३६ अधिकारी होते. त्यापैकी १२२ अधिकारी भारतीय तर उर्वरित अधिकारी मालदीव, नेपाळ, भुतान या देशांमधून आले होते. यापैकी केवळ तीन अधिकारीच परीक्षेत पास झाले. संस्थेतील अधिकाऱ्यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली. यापूर्वीही परीक्षेत अनेकजण नापास होत. मात्र, पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने अधिकारी नापास झाले. ही चिंतेची बाब आहे. बहुतांश अधिकारी कायदा व सुव्यवस्था आणि अंतर्गत सुरक्षा या विषयांमध्ये नापास झाल्याचेही संस्थेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.